Breaking News

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत शेकापचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


अहमदनगर/प्रतिनिधी : “अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बीचा तर प्रश्‍नच नाही. शेतमालाला भाव नाही. दूध दराचा प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. शासनाचे चुकीचे धोरण व निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटांनी वेढला गेला आहे. अशा वेळेस सामाजिक दायित्व म्हणून अन्नदाता शेतकर्‍यास मदतीचा हात द्यावा.

शेतकरी आंदोलनाची सुरुवात करणार्‍या पुणतांबा गावातील शेतकरी कन्या आज पाच दिवसांपासून उपोषणास बसलेली आहे. या उपोषणाची कोणतीही दखल शासकीय पातळीवर घेतलेली दिसून येत नाही. उपोषणास शेकपच्या वतीने आमचा ही पाठिंबा असून, शासनाने त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा शेकपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी’’ असे निवेदन नगर जिल्हा चिटणीस सोपान पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिले.

याप्रसंगी अनिल जाधव, कैलास बोरसे, सुधाकर आव्हाड, संदीप जानराव आदि उपस्थित होते. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सरकारने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, अहमदनगर, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.