Breaking News

मन आणि बुध्दी विकसित केली तर लढण्याची नवचेतना- रेहान शेख


प्रवरानगर/प्रतिनिधी
जीवनातील यशाचा मार्ग हा संघर्षातून जातो म्हणूनच, तरुणांनी आत्मविश्‍वासाच्या जोडीला खेळाच्या माध्यमातून तंदरुस्त शरीराद्वारे मन आणि बुध्दी विकसित केली. तर शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची नवचेतना निर्माण होऊन कोणताही तरुण यश प्राप्तीच्या अंतिम धेयापर्यंत पोहचू शकेल असा विश्‍वास अहमदाबाद विमानतळाचे वरिष्ठ सुरक्षाधिकारी आणि प्रवरेचे माजी विद्यार्थी रेहान शेख यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिला.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि क्रीडादिन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रेहान शेख बोलत होते. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे बोलत होत्या. या प्रसंगी भास्करराव खर्डे, प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे, उपप्राचार्या छाया गलांडे, डॉ.जयसिंगराव भोर, प्रा.दत्तात्रय थोरात, विद्यापीठ प्रतिनिधी निरंजन गोडगे, जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील प्राद्यापकांनी या वर्षात मिळविलेल्या पी.एच.डी.प्राप्त प्राद्यापकांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये डॉ.राम पवार यांनी पदवी मिळविल्याबाबद्दल तर डॉ. विनायक निकुंभ, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. अशोक कानवडे, डॉ.विजय निर्मळ, डॉ.जयश्री चोळके, डॉ.दीपक गाडेकर यांचा आणि डॉ. अश्‍विनी आहेर सेट परीक्षा, प्रा. अनिल दिघे एमफिल उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. नितीन साळी यांनी हि घोषणा केली. तर प्रा. खाडे यांनी एनसीसी आणि एनएसएसमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा केली. कमवा आणि शिका या योजनेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ऋषिकेश राऊत, नियाज पटेल या विद्यार्थ्याला शेखर सुमन पारितोषिक तर, सुस्मिता गवळी या विद्यार्थिनीला कुलगुरू मोहनराव हापसे आदर्श विद्यार्थी पारितोषिकाने गौरविण्यात आले. दिपल गायकवाड, ज्ञानेश्‍वरी सूर्यवंशी, हर्षल खर्डे आणि वाद-विवाद तसेचवक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला यश मिळवून देणार्‍या सुजित मेहेत्रे या विद्यार्थींचाही विशेष बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी शालिनी विखे म्हणाल्या की, शहरातील मुलांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असले तरी, मोकळी हवा आणि क्रीडांगणे ही खेड्यामध्येच असल्याने प्रवरेमधील मुले कुठेही मागे नाहीत. असे सांगून ग्राम स्वच्छता अभियान राबविणार्‍या गाडगे महाराज यांनी माणसामध्ये जसा देव पहिला होता तसा, विखे पाटील यांनी तरुण-तरुणींच्या हातात पुस्तके देऊन, ज्ञानरूपी देव पहिला होता. असे सांगताना म्हणूनच शिक्षणाच्या परिपूर्ण सुविधांबरोबरच देशामध्ये अभिमानास्पद असे क्रीडांगणे जलतरण तलाव आणि क्रीडा सुविधा त्यांनी खेड्यात निर्माण केल्या असे सांगितले. या वेळी शैक्षणिक वर्षांमध्ये गुणवत्ते बरोबरच विविध क्षेत्रामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.