Breaking News

दोन्हीकडेही हाय अ‍ॅलर्ट दोन्ही देशांत कुरापती सुरू; विमाने पाडल्याचे दावे-प्रतिदावेनवीदिल्ली/ इस्लामाबादः भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धज्वर वाढत चालला आहे. जगाने कितीही दडपण आणले, तरी पाकिस्तानने सीमापार कुरघोड्या सुरू ठेवल्या आहेत. पाकिस्तानी विमा्ने भारतात घुसल्यामुळे भारतातील विमानतळांना हाय अॅलर्टचा आदेश देण्यात आला आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारताचे विमान पाडल्याचा दावा पाकिस्ताने केला आहे, तर पाकिस्तानचे एक विमान भारताने पाडले आहे. सीमेवरही चकमकी सुरू आहेत.
लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळे हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे अनेक विमाने विमानतळांवर अडकून पडली असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. त्यानंतरच विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानचे एफ 16 विमान काश्मीरमध्ये पाडण्यात आले. पाकिस्तानने हवाई हल्ल्याच्या भीतीने त्यांच्याकडील सर्व विमानतळे बंद केली आहेत. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूटदेखील दिसले; मात्र विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही.
बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील विज्ञान भवन येथील एक कार्यक्रम अर्धवट सोडून तातडीच्या बैठकीसाठी रवाना झाले. भाषण सुरू असताना मोदी यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली आणि त्यानंतर मोदी यांनी भाषण आवरते घेतले. मोदी यांनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी हे एका तातडीच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. सकाळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित होते. सकाळी बैठकींनंतर मोदी हे विज्ञान भवन येथे युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळ्यात गेले. मोदी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली. ही चिठ्ठी वाचताच मोदी यांनी भाषण आवरते घेतले आणि ते सभागृहातून निघून गेले. पाकिस्तानच्या कुरापतींसंदर्भात ही बैठक असल्याचे समजते.