Breaking News

गोव्यातील शिक्षक महाअधिवेशनात सातार्‍याची छाप


सातारा (प्रतिनिधी) : समाजजीवनात शिक्षक हा महत्वाचा कणा आहे. नगरपालिका शाळेत शिकत खूप लोकांनी गरुडझेप मारली आहे. मीसुध्दा पालिका शाळेत शिक्षण घेतले व शास्त्रज्ञ झालो आहे. शिक्षकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य समाजानेच करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठी व सक्रिय उपस्थिती दाखवून या अधिवेशनावर सातार्‍याची चांगलीच छाप पाडली.

म्हापसा (गोवा) येथील श्री देव बोडगेश्‍वराच्या पटांगणात आयोजित अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन व भव्य शिक्षक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उदघाटन डॉ. माशेलकर व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जेष्ठ संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खा. धनंजय महाडिक, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील, राष्ट्रीय कार्यवाह अशोक पाटील, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. होनगेकर , डॉ. कालिंदी रानभरे, प्राचार्य डॉ. एच. बी. पाटील, सिद्धेश्‍वर पुस्तके व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे विद्यार्थी, समाज , देश घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षकांना पूर्वीच्या काळी प्रतिष्ठा होती. मात्र सध्या ती राहिलेली नाही. जेव्हा समाज ही प्रतिष्ठा शिक्षकांना पुन्हा बहाल करतील तेव्हाच भारत देश खूप मोठा बनेल.
शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील तसेच खा. धनंजय महाडिक व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षकांना निवृत्ती पेन्शन लागू करा, या मागणीसाठी या अधिवेशनात जोरदार आवाज उठवला. सन 2005 नंतर जे पेन्शनबाबत निर्णय झाले, त्याबाबत शिक्षक नाखूष आहेत. पंतप्रधान मोदींनी कामगारांसाठी पेन्शन योजना लागू केली आहे, पण समाज घडवणार्‍या शिक्षकांचे काय? त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजेत. शिक्षकांना पेन्शन लागू करण्यासाठी आपण विधानसभेत तसे संसदेत आवाज उठवणार असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.
खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले की, शिक्षकांना राष्ट्रीय अधिवेशनासाठी रजा मंजूर झाली पाहिजे यासाठी शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिल्लीत थंडीतही पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना राजी केले आहे. गोव्यातील सर्वत्र शिक्षकांच्याच गाड्या दिसत होत्या. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, विदर्भ व मराठवाडा येथून शिक्षक आले होते.

शिवाजीराव पाटलांनी आपल्या संघटनेचे वारस म्हणून सातारा जिल्ह्यातील शिक्षक नेते सिद्धेश्‍वर पुस्तके यांना जाहीर करावे अशी मागणी अनेक शिक्षकांनी केली.

शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी वयाची नवद्दी गाठली तरी त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. त्याचे मान्यवरांनी कौतुक केले. सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, संचालक ज्ञानेश्‍वर कांबळे, शंकर जांभळे, तानाजी म्हस्के, सतीश जाधव, धनावडे, पाटील यांच्यासह वीस हजार शिक्षक वर्ग उपस्थित होते. चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. या अधिवेशनाच्या काळात गोवा येथील जिल्हा प्रशासन, पोलीस व शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सिध्देश्‍वर पुस्तके व सौ. संगीता कदम यांनी आभार मानले.