Breaking News

राज्यात ५ वर्षात ५० हजार किलोमीटर रस्त्यांच्या कामांना सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहमदपूर येथे 11 हजार 680 कोटींच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

लातूर:- जागतिक स्तरावर दळणवळणाच्या चांगल्या सोयीसुविधांमुळे उद्योग व शेती, व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच शैक्षणिक व आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मागील चार-पाच वर्षात 50 हजार किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली आहे. यातील सात हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्ग, 22 हजार कि.मी.चे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे तर सात हजार कि.मी. चे राज्यमार्गाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

अहमदपूर येथे आयोजित लातूर जिल्हा पॅकेज अंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, (सा.बा. ) व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 11 हजार 680 कोटीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळया प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग, जलसंपदामंत्री नितीन गडकरी, कामगार कल्याण,कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर ,खासदार डॉ.सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री विनायक पाटील,सुधाकर भालेराव, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी आमदार गोविंद केंद्रे,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकरी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे, गणेश हाके, नागनाथ निडवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात 15 हजार कि.मी. चे राष्ट्रीय महामार्ग,10 हजार कि.मी. चे राज्यमार्ग तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 30 हजार कि.मी. च्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक गाव रस्त्यांनी जोडले जाऊन विकासाला अधिक चालना मिळणार आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठया प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सन्मान योजनेतून देशातील शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रती शेतकरी सहा हजार रुपयाप्रमाणे 75 हजार कोटी थेट बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 21 हजार कोटींची कर्जमाफी देऊन दिलासा दिला आहे. तसेच ही योजना शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत सुरुच असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या माध्यमातून गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यात नदीजोड प्रकल्पांतर्गत सन 2010 मध्ये झालेल्या कराराचा सर्वाधिक लाभ गुजरातला मिळत असल्याने तो करार या शासनाने रद्द केला असून महाराष्ट्राला लाभ मिळेल असा नवीन करारावर काम सुरु असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगून राज्य शासनाने एकात्मिक जल आराखडा तयार केला आहे. असा आराखडा तयार करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवून हा मराठवाडा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाईपलाईनमधून मराठवाड्याच्या सर्व भागात समप्रमाणात पाणी देण्याचे काम केले जाणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. वॉटर ग्रीडच्या डीपीआरला मान्यता देण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सात ते आठ वर्षे कालावधी लागेल त्यासाठी सुमारे 25 हजार कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक गावे पाणीदार झालेली आहेत. लातूर जिल्ह्याचा लौकिक शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. पण नेहमीच टंचाईमध्ये असणाऱ्या लातूर जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात मोठी कामगिरी करुन देशपातळीवर जलसंधारणच्या कामात प्रथम पारितोषिक मिळवून दुष्काळावर मात केली आहे. लातूरचा जलसंधारणात नवीन पॅटर्न निर्माण केल्याबद्दल लातूरवासियांचे श्री. फडणवीस यांनी अभिनंदन केले.

लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पांमुळे परिसरातील 15 ते 20 हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल. या प्रकल्पाची कामे वेगाने सुरु असून प्रकल्पाची व्याप्ती वाढल्यास अनेक उद्योगांना चालना मिळेल. तसेच महिला बचत गटाची चळवळ जिल्ह्यात गतिमान असून या गटांना मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाने ऑक्टोबर 2018 मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करुन नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये केंद्रीय पथकांनी पाहणी केली. तर केंद्राने पाच हजार 400 कोटींचा निधी दुष्काळातील उपाययोजनांसाठी मंजूर केला व राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपये आतापर्यंत वाटपही केले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना केंद्राने सुरु केली आहे. तर राज्याने बांधकाम कामगारांना केंद्राचे आडीच लाख व कामगार विभागाचे दोन लाख घरासांठी दिले जात आहेत.देशात आजपावेतो पाच लाख घरकुले पूर्ण झाली असून पाच लाख घरकुलांचे काम सुरु आहे 2022 प्रर्यत प्रत्येक बेघर व्यक्तीला घरकुल मिळेल, असे त्यांनी सांगितले. याकरिता राज्यातील 10 लाख अतिक्रमणे मंजूर करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.

नांदेड-लातूर रोड- गुलबर्गा या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असून हा रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल व गरज पडल्यास या रेल्वे मार्गासाठी राज्य शासन 50 टक्के आर्थिक सहकार्य करेल,अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.देशात 2014 मध्ये पाच हजार कि.मी. चे महामार्ग होते.व आज 22 हजार 436 कि.मी. चे महामार्ग आहेत. आज लातूर जिल्ह्यात जिल्हा पॅकेज अंतर्गत औसा-चाकूर, चाकूर लोहा, मांजरा नदी वर बंधारा बांधणे, लोखंडी सावरगाव ते रेणापूर फाटा, लातूर ते पानगाव, उमरगा ते औसा, अहमदपूर ते पिंपळा, जहिराबाद ते लातूर आदी रस्त्यांच्या कामांसाठी 11 हजार 680 कोटींच्या कामांचा मंजूरी देण्यात आली असून त्यातील तीन हजार 895 कोटींच्या कामांचा शुभारंभ आज होत असल्याचे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले.

राज्यात जलसंधारणाची कामे उत्कृष्ट झाली असून मुख्यमंत्री फडणवीस यांचे तसेच राष्ट्रीय जलपारितोषिक मिळाल्या बद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी व नागरिकांचे श्री. गडकरी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

पिंजर -दमणगंगा प्रकल्प व तापी-नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यास या प्रकल्पातील पाणी गोदावरीत सोडले जाऊन जायकवाडी प्रकल्पात आणले जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविला जाऊन सुमारे साडेपाच लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.

राज्यातील साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करावी. केंद्र शासन 59 रुपये प्रति लिटरने इथेनॉल घेईल, असे श्री. गडकरी यांनी सांगून पीक पद्धतीमध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाल्याशिवाय शेतीमालाला भाव मिळणार नाही. लातूर जिल्ह्याने शैक्षणिक पॅटर्न तसेच जलसंधारण पॅटर्न निर्माण केला असून आता हरित पॅटर्न निर्माण करण्यासाठी लातूरकरांनी प्रयत्न करावेत, असे सांगून आष्टा मोड ते उदगीर या रस्त्यांसाठी 273 कोटीचा निधी मंजूर केल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

लातूरसह मराठवाड्याला पाणी व रोजगार मिळाला पाहिजे तसेच नांदेड-लातूर रोड- गुलबर्गा रेल्वे मार्गास मंजुरी मिळावी व जिल्ह्यातील प्रत्येक नदीवरील पुलाच्या ठिकाणी ब्रीज कम बॅरेजची कामे व्हावीत, अशी अपेक्षा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार विनायक पाटील यांचेही भाषण झाले. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी देशाला परम वैभावाकडे घेऊन जावे,असे आवाहन केले.

प्रारंभी जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीपप्रज्वलन करुन तसेच डिजिटल पद्धतीने कळ दाबून विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते 103 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे यांनी केले . तर आभार रामभाऊ बेल्लाळे यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते