Breaking News

अग्रलेख - मराठी मुंबईबाहेर


मराठी ही महाराष्ट्राची भाषा. जगात तिचा भलेही गौरव होत असेल; परंतु अजूनही मंत्रालयाच्या दारात ती फाटकी वस्त्रे धारण करूनच उभी आहे. कुसुमाग्रज यांनी मरठी भाषेच्या अधोगतीबद्दल जी खंत व्यक्त केली होती, ती अजूनही कायम आहे. भलेही मराठीला पैठणी नेसवून मंत्रालयाच्या दारात उभी करू, असे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलेले असेल; परंतु तसा काही अनुभव महाराष्ट्राला येत नाही. उलट, मराठी माणूस आता केवळ मुंबईबाहेरच फेकला गेला नाही, तर तो ठाणे-रायगडमधूनही बाहेर फेकला गेला. मराठी भाषा वैभवसंपन्न बनून मंत्रालयाच्या दारात पैठणी नेसून उभी असलेली दिसेल असे सांगत लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असे तावडे यांनी चार वर्षांपूर्वी सांगितले होते; परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर नाहीच; परंतु तिची उपेक्षा आणखी वाढली आहे. 

मराठी पुस्तके वाचली जावी यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. गावांतच फक्त मराठी टिकून आहे. तिथे वाचन संस्कृती वाढलीच पाहिजे; परंतु मराठी भाषा टिकवण्याचे खरे आव्हान महानगरांत आहे. मराठी साहित्याच्या विक्रीसाठी नगरपालिका तसेच महापालिकांमधील गाळे पुस्तक विक्रीसाठी स्वस्तात भाडयाने उपलब्ध करून देण्याची योजना, आगामी पंचवीस वर्षांसाठी मराठी भाषा विकासाचे धोरण, मराठीची गोडी शाळेतील मुलांमध्ये निर्माण व्हावी तसेच सीबीएससी व आयसीआयसीमध्येही मराठी भाषेचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली होती. त्यापैकी कितींची पूर्तता झाली, हा संशोधनाचा भाग ठरेल. संत ज्ञानेश्‍वरांनी अमृताची उपमा मराठी भाषेला दिली असली, तरी हे अमृत जपण्याऐवजी वाघिणीच्या दुधाला जास्त महत्त्व दिले जात आहे. 

मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या, तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे; पण मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. प्रत्येक मुंबईकर मूळचा कुठला आहे, त्यासंदर्भात संख्यात्मक विश्‍लेषण करणारी अलीकडची कुठलीही माहिती उपलब्ध नाही; परंतु मराठी माणूस अगोदर दक्षिण मुंबईतून उपनगरात, उपनगरातून ठाणे जिल्ह्यात हद्दपार झाला आहे. आता तर मराठी माणसे दुर्बिण घेऊन शोधावी लागत आहेत.
मातृभाषे संदर्भातला 2011 सालचा जनगणनेचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2001 मध्ये मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 25.88 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 35.98 लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत 2.64 टक्के घट झाली. 2001 साली 45.23 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले. अजूनही मराठी मातृभाषा असल्याचे सांगणार्‍यांचे प्रमाण हिंदी भाषिकांपेक्षा चार टक्क्यांनी जास्त असले, तरी मराठी भाषिकांच्या प्रमाणात होणारी घट आणि हिंदी भाषिकांची वाढणारी संख्या पाहता मुंबई हे मराठी भाषकांचे नव्हे, तर हिंदी भाषकांचे शहर झालेले असेल.
मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल 80 टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाही, तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष मुंबईने अनेकदा अनुभवला आहे. 2009 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेला याच मुद्दाचा फायदा झाला होता. त्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मुंबई आधी बंदराचे शहर म्हणून ओळखले जात होते. मुंबईत कपडा मिल सुरू झाल्यानंतर कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर नागरिक मुंबईत स्थायिक झाले. मागच्या 40 वर्षात उत्पादन केंद्र ते सेवा उद्योग असा मुंबईमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार स्थलांतरचा पॅटर्नही बदलला आहे. आधी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले. ज्यातील बहुसंख्याची बोलीभाषा मराठीच होती; परंतु संपामुळे कापड गिरण्या बंद पडल्या. कापड उद्योगातील नोकर्‍या कमी झाल्यानंतर मुंबईत उत्तर प्रदेश, बिहारमधून स्थलांतर वाढले. अत्यंत स्वस्तात हा कामगार उपलब्ध झाला. मासेमारी आणि त्यावर पूरक उद्योगातील मराठी टक्काही असाच घसरत गेला.
महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणार्‍या स्थलांतराचे प्रमाण 1961 साली 41.6 टक्के होते ते 2001 साली 37.4 टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणार्‍या स्थलांतराचे प्रमाण वाढले. 1961 साली उत्तर प्रदेशातून मुंबईत 12 टक्के स्थलांतरीत येत होते, तेच प्रमाण 2001 साली 24 टक्के झाले. हे उत्तर भारतीय स्थलांतरीत असंघटित क्षेत्रात मोठया प्रमाणावर आहेत. इथे वेतनही कमी आणि कामाचीही हमी नसते.
मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली, तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे. 2001 साली मराठी मातृभाषा आहे सांगणार्‍यांची संख्या 45.24 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली. 2001 साली 14.34 लाख लोकांनी गुजराती मातृभाषा असल्याचे सांगितले होते. 2011 मध्ये हीच संख्या 14.28 लाख होती. 2001 मध्ये ऊर्दू भाषिक 16.87 लाख होते. 2011 मध्ये हे प्रमाण 14.59 लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. 25.82 लाखावरून हिंदी मातृ भाषा आहे सांगणार्‍यांची संख्या 35.98 लाख झाली. 39.35 टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला; पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली. ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या 80.45 टक्के, तर रायगड जिल्ह्यात 87 टक्के आहे. आज जगात सहा हजार भाषा बोलत्या जातात. वीस लाख लोक तीनशेच्या वर भाषा बोलतात. भाषिकांच्या संख्येनुसार मराठी भाषा देशातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे, तर जगातल्या असंख्य भाषांमध्ये मोठे समूह बोलणार्‍यांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. कोणत्याही राज्याचा नागरिक हा ज्या राज्यात वर्षानुवर्षे राहतो, त्याला त्या राज्याची मातृभाषा शिकणे, बोलणे अनिवार्य असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्याचा कारभार हा त्या त्या राज्याच्या भाषेत चालतो; परंतु महाराष्ट्रात मराठीचा द्वेष असणार्‍यांनी या गोष्टीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठीबाबत आग्रही भूमिका घेतली नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते; परंतु तेवढी समज असलेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा यांच्याशी जणू काही देणेघेणे नाही, असे राज्यकर्त्यांचे वागणे राहिले. पश्‍चिम बंगाल, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी आग्रही भूमिका घेऊन तेथील स्थानिक मातृभाषेला व तिथल्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले. इतके की दाक्षिणात्य राज्यांत इंग्रजी शाळांना तेथील मातृभाषेतच शिक्षण द्यावे लागते. आपल्याकडे मात्र गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. सीबीएससी आणि आंतरराष्ट्रीय शाळांतून मराठी विषय शिकविण्याची सक्ती असूनही हा नियम धाब्यावर बसविला जातो. मराठी भाषा एक समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. तत्त्वज्ञान सर्व समाजांपर्यंत पोहचावे, या हेतूने ज्ञानेश्‍वरांच्या काळात मराठीचा वापर केला गेला. तरीसुद्धा या भाषेची उपेक्षा होत आहे. मराठी भाषेची आज जी काही अवनती झाली आहे, त्याला मराठी माणसाची दांभिक वृत्तीच कारणीभूत आहे.