विठाबाई नारायणगावकर पुरस्कार वादाच्या भोवर्‍यात; कवठेकर यांना पुरस्कार देण्यास कलावंतांचा आक्षेप; योगदानाबाबत सवाल


पुणे/ प्रतिनिधीः
राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्‍या ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’ बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला आहे; मात्र तमाशा व लोककला कलावंतांनी या निवडीवर आक्षेप घेतला आहे. कवठेकर यांनी लेखन केले आहे; पण तमाशासाठी काय काम केले का? असा सवाल कलाकारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पुरस्कार निवड समिती बरखास्त करा, अशी मागणी या कलाकारांनी केली.
लोकशाहीर गफूरभाई पुणेकर सोशल फाउंडेशन, कलाकार महासंघ आणि तमाशा व लोककला कलावंतांनी सरकारच्या निवडीवर जोरदार आक्षेप नोंदवले. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. कवठेकर यांना पुरस्कार देण्यास प्रशांत बोगम, अमर पुणेकर, सत्यभामा आवळे यांनी विरोध दर्शवला. या वेळी मीना गायकवाड, प्रभा महाडिक आदी कलाकार उपस्थित होते.

सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. पुरस्कार वितरण कार्यक्रमात कलाकार सरकारचा निषेध करतील, असा इशारा या कलाकारांनी दिला. कवठेकर यांनी काय काम केले, असा सवाल करून ज्येष्ठांना डावलून इतरांना पुरस्कार दिला जात आहे. प्रत्यक्ष फडात काम न करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो, अशी टीका पुणेकर यांनी केली. एका व्यक्ती ऐवजी पाच लोकांना प्रत्येकी एक लाख या स्वरुपात पुरस्कार द्यावा, अशी मागणी पुणेकर यांनी केली.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक खात्याचे सचिव तसेच दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार, प्रकाश खांडगे, भीमराव गोपाळ, विद्याधर जिंतीकर, श्यामल गरूड यांची निवड समिती आहे. यातील पुणेकर आणि गोपाळ हे बिगर शासकीय सदस्य वगळता एकाही व्यक्तीला तमाशाची माहिती नाही. समितीमध्ये तमाशासंबंधित कलाकार किंवा फड मालक असले पाहिजे. गेल्यावर्षी मधुकर नेराळे यांना पुरस्कार दिला. ही निवडही चुकीची होती. ही समिती बरखास्त केली पाहिजे, अशी मागणी कलाकारांनी केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget