Breaking News

न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार उंब्रज येथील निवृत्त पोलीसाचा इशारा


उंब्रज (प्रतिनिधी) : ध्वनीप्रदूषणाचे नियम डावलून सुरु असलेले भर वस्तीतील कांडप यंत्र बंद करावे यासाठी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांना लेखी कळवूनही त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आठ दिवसात न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मोहन भैरु बोंगाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहन बोंगाणे हे सन 1999 पासून उंब्रजला घर बांधून स्वमालकीच्या जागेत राहत आहेत. त्यांच्या घरासमोर मिरची कुटायचे कांडप यंत्र असून त्याच्या कर्णकर्कश आवाजाचा सर्वानाच त्रास होत असून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणही होत आहे. संबंधितांना ध्वनी प्रदूषणाबाबत लेखी कळवूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. बोंगाणे यांना मधुमेहाचा त्रास असल्याने या कांडपयंत्राच्या जोरदार धडधडीचा नाहक त्रास होत आहे. याबाबत संबंधितांना लेखी निवेदनाद्वारे कळवूनही मला न्याय दिला जात नाही. याबाबत आठ दिवसात मला योग्य न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असून त्यास सर्वस्वी संबंधित शासकीय यंत्रणाच जबाबदार असेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.