आरएसएसचा विचार उखडून फेकूया : आ. चव्हाण; काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे पदग्रहण


सातारा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार राज्यातून उखडून फेकूया व पुन्हा एकदा बहुजन समाजाचे सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दरम्यान, आपण पुणे, सांगली अथवा नागपूर लोकसभा लढणार असल्याच्या चर्चा निरर्थक असून कराड- दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत बोलत होते. त्यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, मोहनराव कदम, ज्येष्ठ नेते हिंदुराव नाईक-निंबाळकर, युवक जिल्हाध्यक्ष रतन शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, रजनी पवार, नम्रता उत्तेकर यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, भाजपच्या निमित्ताने देशावर बुरसटलेल्या विचारांचे संकट आले आहे. येत्या काळात हेच सत्तेत राहिले तर महापुरूषांनी घडविलेला इतिहास राहिल की नाही, हा प्रश्‍न आता निर्माण होवू लागला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये केंद्र व राज्य सरकारमध्ये चाललेला संघर्ष आजपर्यंत देशाने कधीही पाहिला नव्हता. भाजपला राज्यघटना उध्वस्त करून देशातील लोकशाही नष्ट करायची आहे. त्यांना रोखण्यासाठी देशातील 22 पक्षांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे त्यांच्या उत्तर भारतातील तब्बल शंभरपेक्षा जास्त खासदारांची संख्या कमी होणार आहे.

काँग्रेसचे सरकार आले तर लोकांना दारिद्रयातून बाहेर काढण्यासाठी किमान उत्पनाचा कायदा निर्माण केला जाणार आहे. असे सांगून चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा 10 हजार जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्यांना मंजुरी दिली. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलले आहे. इतर पदांपेक्षा जिल्हाध्यक्ष पद सांभाळणे कठीण बाब असली तरी सर्वांना सोबत घेवून जाण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्याकडून कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घेणार आहे. मात्र, आगामी काळात राजकीयदृष्टया कटू निर्णय घ्यावे लागतील. जिल्हाध्यक्षपद ही केवळ शोभेची बाहुली न राहता कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल. प्रसंगी संघर्षाला देखील सामोरे जाण्याची तयारी असून त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठीवर थाप द्यावी. तसेच आनंदलाव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget