Breaking News

कराड जिमखान्याचा दीप पुरस्कार संजीव शहा यांना जाहीर


कराड (प्रतिनिधी) : येथील कराड जिमखान्याच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान देणार्‍या दीपक शहा यांचा 15 फेब्रुवारी हा स्मृतिदिन संस्थेतर्फे सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने कला, क्रीडा, निसर्ग, साहित्य व समाजसेवा या संस्थेच्या ध्येय-उद्दिष्ठांना अनुसरुन समाजात निरपेक्षपणे कार्यरत असलेल्या सक्षम कार्यकर्त्याला दीप पुरस्काराने गौरविण्यात येते.

त्यानुसार यंदाचा दीप पुरस्कार जीवदया प्रतिष्ठान व अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ग्रुपच्या माध्यमातुन गेली अनेक वर्षे स्वखर्चाने कराड व परिसरात जखमी प्राण्यांवर औषधोपचार करणारे, भटक्या जनावरांची देखभाल व संरक्षण करणारे सिव्हील अभियंता संजीव शहा यांना जाहीर करण्यात आल्याची माहीती संस्थेचे जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी दिली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 15 रोजी दुपारी साडेतीन वाजता बाबूलाल पदमसी सभागृहात आयोजित सदभावना मेळाव्यात जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, बुके, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून परमपुज्य जैन मुनि आत्मरती विजयजी महाराज व हितरती विजयजी महाराज हे उपस्थित राहणार आहेत.