Breaking News

सातार्‍यातून शरद पवारांनीच निवडणूक लढवावी; जिल्हा राष्ट्रवादीकडून आवताण जिल्ह्यातील राजकारणात खळबळ


सातारा (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच निवडणूक लढविण्याचे आवताण सातारा जिल्हा राष्ट्रवादीकडून आल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.

सातारचे राष्ट्रवादी खा. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची हट्रिक साधण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक काही आमदारांचा विरोध असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेतली? याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे सातारा जिल्हा उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी सातार्‍यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. तर दुसर्‍या बाजूला पक्षातील वजनदार नेते प्रफुल पटेल यांनी खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात सभा गाजवून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळून दयावे, अशी अपेक्षा दिल्ली भेटीदरम्यान व्यक्त केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्हातील माण-खटाव व फलटण हे विधानसभा मतदारसंघ येतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. विजयसिंह मोहिते पाटील, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, युवा नेते शेखर गोरे ही नेतेमंडळी इच्छुक आहेत. यापूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यामधून विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. आता राजकीय मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेतले आहे. त्याचाही फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार का? हे आगामी काळच ठरविणार आहे.

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मान, सत्कार करून मानपत्र देण्यात समाधान मनात असले तरी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र जुळल्यास नवल वाटणार नाही. भाजप पक्षनेता कोणाला सातारा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करणार? हे स्पष्ट झाले नसले तरी भाजपचे पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा निवडणुकीत आपणच उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले असून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

खा. उदयनराजे भोसले यांना मागील दोन्ही निवडणुकांवेळी खासदरकीसाठी मोठे आव्हान नव्हते पण, सध्या विकासकाम,े ठेकेदारी लॉबी, टोल नाका वसुली ठेका, संसदेतील अनुपस्थिती, अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा रद्द करण्याची मागणी, मतदारसंघातील साडेचार वर्षात संपर्क साधता आला नाही. या उदयनराजेंच्या नकारात्मक बाबींचा विरोधकांनी आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. तर दुसर्‍या बाजूला खा. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता व नवमतदारांचे आकर्षण या गोष्टी त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे सोपी वाटणारी सातारा लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याच्या मार्गावर आली आहे. असे मानले जाऊ लागले आहे.