Breaking News

पाटणला चार पंचायतींसाठी रणधुमाळी सुरु


पाटण,  (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील मुदत संपणार्‍या चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांच्या निवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी विहे व चाफळच्या निवडणुकीतील घडामोडींविषयी संपूर्ण तालुक्यात उत्सुकता असून पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

तालुक्यातील चार महत्त्वाच्या ग्रामपंचायतींसाठी पाच मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असल्याने तालुक्यातील देसाई व पाटणकर या दोन्ही राजकीय गटांमध्ये शह काटशहाचे वातावरण तापले आहे. पाटण तालुक्यात पाच महिन्यापूर्वीच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असताना आता आणखी चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. मंगळवार, दि. पाच मार्चपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. सार्वत्रिक निवडणुका होणार्‍या तालुक्यातील विहे, चाफळ, पाबळवाडी आणि डाकेवाडी (काळगाव या पाटण तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

तहसिलदार रामहरी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या जाहीर झालेल्या कार्यक्रमांमध्ये मंगळवार,दि. 5 ते 9 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे भरता येतील. दि. 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता छाननी सुरू होईल. दि. 13 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल. आणि दि. 24 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया पार पडेल. मतमोजणी पाटण तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयात सोमवार दि. 25 मार्च रोजी होणार असून या निवडणुकीत सर्व उमेदवारी अर्ज आँनलाईनच भरावयाचे आहेत, असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

दरम्यान पाटण विधानसभा मतदार संघातील आमदार शंभूराज देसाई गट आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दोन्ही राजकीय गटामध्ये चाफळ व विहे या मोठ्या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी व सत्तांतरासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चढा ओढ सुरु झाली असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.