बोगदा-कास रस्त्याचे रुंदीकरण फक्त कागदावरच
परळी वार्ताहर : बोगदा - कास रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य व केद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला. या कामासाठी तब्बल 80 कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने यश आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले होते. मात्र रस्त्याच्या कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही. हे काम कधी मार्गे लागणार? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी अनुत्तरीतच आहे.
जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले कास पठार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पावसाळ्यानंतर उमलणारी विविधरंगी व दुर्मिळ फुले पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या पठाराला भेट देतात. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा व कासच्या वैभवात भर पडावी, यासाठी बोगदा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.
या कामासाठी अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही. जैवविविधतेने नटलेले कास पठार हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा संपला की या ठिकाणी सुरु राहणारा फुलोत्सव डोळ्यांचे पारणे फेडतो. फुलांसह अनेक दुर्मिळ प्रजातीची फुलपाखरे या परिसरात नेहमीच आढळून येतात. त्यामुळे पर्यटकांसह पक्षी व प्राणीमित्रांची पावले दरवर्षी कासकडे वळत असतात. आपल्या वैशिष्टपूर्ण फुलांमुळे कास पठाराची नोंद अल्पावधीतच युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये झाला. फुलांचा हंगाम सुरु झाला की जगभरातील सुमारे दीड ते दोन लाख पर्यटक या पठाराला भेट देतात. कास पठाराबरोबचर कास तलाव, देशातील सर्वात उंच असलेला भांबवली-वजराई धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. शनिवार व रविवार या सुटीदिवशीही काही हौशी पर्यटक कास पठार व तलावाला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून याठिकाणी येणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. यावर तात्पुरता उपाय म्हणून वनविभागाच्यावतीने फुलांचा हंगाम सुरु झाल्यानंतर ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण आणले जाते. ही समस्या कायमस्वरुपी सुटावी व पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बोगदा ते कास या मार्गाच्या रुंदीकरणाचा विषय एकं ते दीड वर्षांपूर्वी चर्चेस आला. मात्र सध्या तरी या रस्त्याचे भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून नाराजीचा सूर आहे.
Post a Comment