Breaking News

मोदी भ्रष्ट, त्यांची जागा तुरुंगात राहुल गांधी यांचा आरोप; देशाच्या सुरक्षेशी तडजोड


नवीदिल्लीः राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचे मध्यस्थ म्हणून काम केले. मोदी हे भ्रष्टच असून त्यांनी गोपनीयतेचेही उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी यांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोप त्यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या मोदी यांच्या घोषणेच्या 15 दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकार्‍यांची भेट घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले. या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राफेल करारासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला माहिती नव्हती. परराष्ट्र मंत्रालय आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला(एचएएल) देखील कराराची माहिती नव्हती; मात्र अंबानी यांना कराराच्या 10 दिवस अगोदरच सर्व माहिती होती. मोदी यांनी गोपनीयतेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप राहुल यांनी केला. गोपनीयतेच्या उल्लंघनप्रकरणी मोदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राहुल यांनी केली.

एखाद्या हेरासारखे मोदींनी काम केले असून त्यांना या प्रकरणात तुरुंगात टाकले पाहिजे. त्यांनी संरक्षण कराराची माहिती अंबानी यांना माहिती दिली होती, हा गंभीर प्रकार आहे, असे त्यांनी सांगितले. फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी करण्याच्या घोषणेच्या 15 दिवस आधी, म्हणजे मार्च 2015च्या चौथ्या आठवडयात अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांची बैठक घेतली होती, असे संबंधित वृत्तात म्हटले होते. याचा दाखलाही राहुल यांनी दिला. या बैठकीनंतरच अंबानी यांनी कंपनीची स्थापना केली होती, असा आरोप राहुल यांनी केला. पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. त्यांनी संरक्षण संदर्भातील माहिती अशा व्यक्तीला दिली, की ज्याला ही माहिती मिळणे अपेक्षित नव्हते, असे त्यांनी सांगितले.