Breaking News

टोलनाक्यावर पाणी व स्वच्छता पुरवणे बंधनकारक; हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई : कैलास शिंदे


सातारा (प्रतिनिधी) : महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी स्वच्छतेच्या सुविधांसाठी या टोलनाक्यावर थांबत असतात. टोलनाका व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी महिला व पुरूषांसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूस शौचालय व मुतार्‍यांची व्यवस्था पुरेशा व स्वच्छ स्थितीत पुरवावी. तसेच यामध्ये कायम पाणी व लाईटची व्यवस्था असावी. टोलनाका व्यवस्थापनाने पाणी व स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याबाबत हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत कडक कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिला.

जिह्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी व तासवडे हे दोन टोलनाके आहेत. या ठिकाणी पाणी व स्वच्छता विषयक सुविधा पुरवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व टोलनाका व्यवस्थापक यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीत बोलताना डॉ. कैलास शिंदे म्हणाले की, महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी स्वच्छतेच्या सुविधांसाठी या टोलनाक्यावर थांबत असतात. टोलनाका व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी महिला व पुरूषांसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूस शौचालय व मुतार्‍यांची व्यवस्था पुरेशा व स्वच्छ स्थितीत पुरवावी. तसेच यामध्ये कायम पाणी व लाईटची व्यवस्था असावी, प्रवाशांसाठी पिण्याचे स्वच्छ आणि शुद्द पाणी पुरवावे, पाणी व स्वच्छता विषयक सुविधांच्या वापरासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, टोलनाक्याच्या हद्दीत असणाऱया टपऱयांनी स्वच्छताविषयक सर्व नियम पाळावेत, याबाबत टोलनाका व्यवस्थापकांनी संबंधितांना कळवावे व जे स्वच्छता पाळणार नाहीत, अशा टपर्‍या त्यांच्या हद्दीतून हटवण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. ग्रामपंचायतींनी टोलनाका व्यवस्थापन पुरवित असणार्‍या सुविधांची नियमित तपासणी करुन त्रुटींबाबत प्रशासनास लेखी कळवावे. टोलनाका व्यवस्थापनाने पाणी व स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याबाबत हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत कडक कार्यवाही केली जाईल, असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, आनेवाडीचे सरपंच शिवाजी गोरे, वराडेचे उपसरपंच रवीद्र घाडगे, ग्रामसेवक संजय वर्णेकर, सदाशिव खांडके, टोलनाका व्यवस्थापनाचे रमेश शर्मा, टोलनाका प्रतिनिधी व जिल्हा तज्ञ राजेश भोसले, गणेश चव्हाण, ऋषिकेश शिलवंत आदी उपस्थित होते.