Breaking News

न्यू विंडो - गोपीनाथरावांच्या मृत्यूचं कवित्त्व सुरूच


लंडनमध्ये हॅकरनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली. सामान्यांच्या मनात जी भावना आहे, तीच भावना हॅक रनं व्यक्त केली असली, तरी हॅकर हा चोर आहे, त्यावर किती विश्‍वास ठेवायचा, असं भाजप म्हणतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आता या प्रश्‍नाचं भांडवल करायला प्रारंभ केला आहे. मुंडे यांच्या मृत्यूनंतर साडेचार वर्षांत या अपघातप्रकरणी कुणाला शिक्षा होणार नसेल, तर जनतेच्या मनात प्रश्‍न उपस्थित होत राहतील. केवळ सीबीआयच्या अहवालावर जनतेचं समाधान होणार नाही.


गोपीनाथ मुंडे हे संघर्ष करणारं नेतृत्त्व होतं. स्वबळावर त्यांनी राज्यात संघटन बांधलं होतं. त्यांच्यावर ही भाजपत अन्याय झालाच होता. त्यामुळं तर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अर्थात मुंडे यांच्यामागं असलेला इतर मागासवर्ग समाज लक्षात घेता भाजपला त्यांना दुःखवून चालणारं नव्हतं. त्यांना खरं तर राज्याच्या राजकारणात जास्त रस होता; परंतु तरीही त्यांनी केंद्रात त्यांच्या आवडीचं ग्रामविकास खातं स्वीकारलं होतं. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातल्या पहिल्या नागरी सत्कार समारंभाला ते येणार होते. तीन जून 2014 चा तो दिवस. मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडं निघाले होते. त्यांचं सरकारी निवासस्थान ते विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. एका सिग्नलजवळून जाताना दुसर्‍या एका वाहनानं त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यात मुंडे यांना प्राण गमवावे लागले. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं होतं, ते गोपीनाथराव अकाली गेले. त्यांच्या निधनानं मुंडे कुटुंबाला झालेलं दुःख समजण्यासारखं आहे. त्यांची कधीच भरून न येणारी हानी झाली आहे. महाराष्ट्राचंही मोठं नुकसान झालं. मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता, की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली. जेव्हा मुंडे यांचं पार्थिव परळीला नेण्यात आलं, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही ठराविक नेत्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेतल्या, तर लोकांच्या मनात त्यांच्या मनात शंका होत्या, हे उघड होतं. त्यानंतर सीबीआयच्या अहवालानुसार अपघात झाल्याचं स्वीकारण्यात आलं, तरी शंका कायम होत्या. जनतेची स्मरणशक्ती कमी असते, असं म्हणतात. तसं मुंडे यांच्या मृत्यूचं झालं. आता साडेचार वर्षानंतर हा वाद उफाळून आला आहे. मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर तज्ज्ञानं केला. ईव्हीएम हॅकिंग आणि मुंडे यांच्या हत्येचा संबंध जोडल्यानं त्यांच्या मृत्यूबद्दल पुन्हा संशय निर्माण झाला आहे. साडेचार वर्षांत मुंडे यांच्या मृत्यूबाबतच्या शंकाचं निरसन करण्यात सरकार कमी पडल्यामुळंच आताची परिस्थिती ओढवली आहे.


मुंडे यांना झालेला अपघात, त्यानंतर दिलेली वेगवेगळी माहिती यामुळं लोकांचा त्यावर विश्‍वास बसला नाही, डॉक्टरानी अंतर्गत रक्तस्त्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं; मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. शवविच्छेदन अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्त्राव असं सांगितलं असलं तरी, भाजपला लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा पद्धतीनं हे कारण पटवून देण्यात यश आलं नाही. मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्‍नांची उत्तरं मिळाल्याचं सांगण्यात आलं असलं, तरी सामान्यांच्या मनातील शंका आणि काही प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत आहेत. अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत मुंडे नीट होते, सर्वांशी हसूनखेळून बोलत होते. त्यामुळं त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता, त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. मुंडे यांच्या मृत्यूबद्दल हॅकर जो दावा करत आहे, त्यासाठी कोणताही पुरावा दिला जात नाही. हॅकरवर विश्‍वास कसा ठेवायचा, असा प्रश्‍न मुंडे कुंटुबाचे नातलग प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. त्यांचं म्हणणं योग्य आहे; परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर एका हॅकरनं दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचा जेव्हा आरोप केला, तेव्हा त्याचा प्रतिवाद भाजपनं केला नाही. उलट, भाजपनं त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं. आता तर मुंडे यांच्याबाबतीत हॅकरला वेगळा न्याय आणि माझ्याबाबत वेगळा न्याय का, असा प्रश्‍नच त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं सामान्यांच्या मनातलं शंकेचं घर आणखीच रुंदावत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथरावांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं, ते संशयास्पद होतं. गाडीची गाडीला जशाप्रकारे धडक बसली होती, ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. आपण स्वतःही गोपीनाथरावांची गाडी पाहिली होती, म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्‍नचिन्ह तेव्हाही निर्माण झालं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. 

गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला. त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळं पीए आणि ड ्रायव्हरनं त्यांना तातडीनं ‘एम्स’च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. ‘एम्स’ मध्ये पोहचल्यावर त्यांचं ह्रदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं. मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरी यांनी हाताळली होती. गडकरी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीच मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं. आता शुजा यांच्या आरोपानंतर त्यावरून राजकारण तापलं आहे. सय्यद शुजा याच्या आरोपानंतर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या मागणीला उत्तर देताना पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ह्या साल्या लुच्चा-लबाड्या लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यूदेखील एक संधी वाटत आहे. मुंडे साहेबांना काही झालं हे मला माहिती असेल, तर ज्यानं केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. माझ्या बापाला काही झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वत:चा जीव माझा जागच्या जागी जाईल, असं भावनिक मत त्यांनी व्यक्त केलं. तेवढ्यावर न थांबता राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे. तुम्हाला 4 वर्षांनंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसतं आणि तुम्हाला त्या राजक ारणात एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे पंकजाचा राजीनामा पाहिजे, एवढी का पंकजाची तुम्हाला भीती आहे, असे सवाल त्यांनी केले. एवढ्या खालच्या पद्धतीचं, एवढं घाणेरडं राजकारण, या महाराष्ट्राच्या इतिहासानं पाहिलं नाही, असं त्या म्हणाल्या. अर्थात ती संधी भाजपनंच राष्ट्रवादीला उपलब्ध करून दिली, हे विसरता येणार नाही. पंकजा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंडेच्या हत्येबाबत राष्ट्रवादी राजकारण करत नाही, असं स्पष्ट केलं. जनतेच्या मनात शंका आहे आणि त्याला एखाद्या हॅकरनं दुजोरा दिला आहे, तर त्याबाबतीत आम्ही राजकारण करतो, असा त्याचा अर्थ होत नाही. हॅकर बोलल्यानंतर त्यांच्या भागातील लोकांच्या मनात आहे की, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंडेंच्या नावानं राजकारण करायचं, मतं मागायची आम्हाला काही गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला चौकशीची सुरुवात आमच्यापासून करायची असेल तर जरूर करा, असं आव्हान त्यांनी दिलं. 

प्रकरणावर तिथं पडदा पडला नाही. धनंजय मुंडे यांनी त्यानंतरही काही प्रश्‍न उपस्थित केले. एखाद्या वाहनाला अपघात झाला, त्यात सामान्यांचा बळी गेला, तर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल होतो. त्याच्यावर कारवाई होते. प्रकरण न्यायालयात चालतं. अलिकडच्या काळात अपघात प्रकरणांचे निकाल लवकर दिले जातात. गुन्हा सिद्ध झाला, तर चालकाला शिक्षा होते. सामान्यांच्या बाबत असं होत असेल, तर गोपीनाथरावांच्या वाहनांना ज्या वाहनाची धडक बसली, त्या वाहन चालकावर काय कारवाई केली, याचं उत्तर मिळालं पाहिजे. ते मिळत नाही. गोपीनाथरावांचे पीए, त्यांच्या वाहनाच्या चालकाची साक्ष न्यायालयात नोंदविली का, या प्रश्‍नाचं उत्तरही मिळत नाही. त्यामुळं संशय घ्यायला जागा राहते. शंका आणि संशय घ्यायला जागा राहू नये, असं वाटत असेल, तर सामान्यांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरं तपास यंत्रणा आणि सरकारनं ही द्यायला हवीत. त्याचं राजकारण करण्याची कुणालाच संधी मिळणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. राष्ट्रवादीनं ही के वळ एखाद्याच्या मृत्यचं भांडवल करता कामा नये.