शेतकर्‍यांना विक्रीसाठी जागा निश्‍चित करुन द्याव्यात : अनिल घनवट


अहमदनगर /प्रतिनिधी : “ शेतकर्‍यांना आपला शेतीमाल कोठेही विकण्याची परवानगी असावी, मार्केट सेस रद्द करावा व शहरांमध्ये शेतकर्‍यांना आपला माल विकण्यासाठी जागा निश्‍चित करुन द्याव्यात’’ या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष बापूसाहेब आधव, संजय तोरडमल, विक्रम शेळके, महादेव खामकर, रमेश रेपाळे, डॉ.संजय कुलकर्णी, कारभारी कणसे, शिराज शेख, अनिल भुजबळ, रमेश गिरमे, नानासाहेब जाधव, अंबादास राऊत, अवसरे महाराज, बाळासाहेब सातव, बन्सी इंगळे, संजय करपे, अंबादास चव्हाण, जनू जगताप, संपत सातव, शंकर नन्नवरे, बिभीषण लगड उपस्थित होते.  
ते पुढे म्हणाले, “शेतकर्‍यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे, शेतीमाल कोठेही विकण्याची परवानगी असावी, ही शेतकरी संघटनेची गेल्या चाळीस वर्षांपासूनची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केला पण इतर माल अद्याप नियमनात आहे. हिवाळी अधिवेशनात संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करण्याचे विधेयक मांडण्यात आले होते मात्र व्यापारी व हमाल मापाड्यांच्या दबावामुळे विधेयक मागे घेण्यात आले होते. 15 जानेवारी 2019 ला शेतकरी संघटना, व्यापारी संघटना व हमाल मापाडी संघटनांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेऊन दुरूस्ती विधेयक मांडण्याचे ठरले आहे. सरकारने कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी धरणे आंदोलन जाहीर केले आहे.’’

यावेळी महाराष्ट्र शासनाने फळे भाजीपाल्याची नियमन मुक्ती केली पण शहरात शेतमाल विक्रीसाठी अधिकृत जागा नसल्यामुळे शहरात शेतकर्‍यांची मोठी कुचंबना होते. काही नागरिक, स्थानिक गुंड, पालिका कर्मचारी, पोलीस शेतकर्‍यांना माल विकू देत नाहीत, हप्ते मागतात, या त्रासातून सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत पार्क, खुल्या जागेत शेतकर्‍यांना ठराविक जागा निश्‍चित करुन दिली पाहिजे, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. शासनाने तातडीने अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी न केल्यास संघटनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी बोलताना दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget