Breaking News

देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी दानपेट्या उघडाव्यात; राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन


बारामती : राज्यात दुषकाळी परिस्थिती गंभीर असल्यामुळे, दुष्काळ निवारण्यासाठी देवस्थान संस्थांनाही हातभार लावून दानपेटया उघडाव्यात असे आवाहन, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, अशी चिंताही शरद पवार यांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरचं उदघाटन आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण आज शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आणखी काही वर्षे हिच स्थिती राहिल, असा अंदाज आहे. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची असली तरी देवस्थान संस्थांनीही हातभार लावला पाहिजे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी, असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत त्यांनी गतकाळातील काही प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. ज्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकालात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेत त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. दर दिवशी या देशात शेतकरी आत्महत्या करत असून, सरकार मात्र त्यावर काहीच पावलं उचलत नसल्याचं खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘वर्षभरासाठी सरासरी कुटुंबात पाच व्यक्ती असणार्‍या एका शेतकरी कुटुंबाला सहा हजार रुपयांची तरतूद.... ही काही कर्जमाफी झाली का?’, असा प्रश्‍न उपस्थित करत, ’कर्जमाफी तर आम्ही दिली होती’ हे विधान त्यांनी केलं. इतकच नव्हे, तर त्यांनी आपल्या कार्यकाळात दिलेल्या कर्जमाफीचे आकडेही यावेळी मांडत व्याजदरात केलेली कपातही निदर्शनास आणून दिली.

देशातील सध्यस्थितीवरही पवारांनी भाष्य केलं. निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकांमध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरुय हे आपण सर्वजण पाहत आहोत. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्ले होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरिकांनी घेणं गरजेचं आहे, असंही शरद पवार म्हणाले. या कार्यक्रमात एका नेत्यानं शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवत आहेत. जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहिल, अशा शुभेच्छा दिल्या. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय, या विचाराने आपल्या पोटात गोळा आला होता, असं सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.