Breaking News

विवेक सावंत यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर


कराड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या 45 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उंडाळे येथे रौप्य महोत्सवी मराठी साहित्य संमेलन व स्वातंत्र्यसंग्राम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पुण्यातील एमकेसीएल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीचे संचालक अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी दिली.

स्वा. दादा उंडाळकर यांच्या 45 व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे (ता. कराड) येथील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे विश्‍वस्त प्राचार्य गणपतराव कणसे, माजी सभापती प्रदिप पाटील यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, पारतंत्र्याच्या काळात दादांनी गांधीजींच्या 1942 च्या केलेल्या सामाजिक कार्यास तोड नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या चले जाव चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन दादांनी स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या प्रेरणेने कराडच्या तहसिल कार्यालयावर गोरगरीब शेतकर्‍यांना एकत्र करुन यशस्वी केलेला मोर्चा व त्यामध्ये त्यांना झालेली अटक व तुरूंगवास ही दादांच्या राष्ट्रभक्तीची साक्ष आहे. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्यता निवारण, कृषी व शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले कार्य त्यांच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देणारे आहे. दादांच्या या कार्याची ओळख आजच्या पिढीला निश्‍चितपणे प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. विलासकाका पाटील- उंडाळकर यांनी त्यांचे कार्य सामाजिक जाणिवेतून अखंडपणे गेली पन्नास वर्षे चालू ठेवले आहे.

प्राचार्य कणसे म्हणाले, दि. 17 व 18 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने उंडाळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.17) सकाळी ग्रंथदिंडीने या कार्यक्रमास प्रारंभ होत असून, त्याच दिवशी रौप्य महोत्सवी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी प्रमोद कोपर्डे यांच्या हस्ते होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी असतील. सोमवार (दि. 18) रोजी यंदाचाचा स्वा. दादा उडाळकर सामाजिक पुरस्कार पुण्यातील एमकेसीएल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांना महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.