Breaking News

सरकार विरोधात ‘राष्ट्रवादी’चा हल्लाबोल


अहमदनगर/प्रतिनिधी : “दुष्काळी परिस्थिती, खोटे आश्‍वासन व बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याच्या निषेधार्थ व भाजप- शिवसेना सरकारचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले असून मोर्च्याचे आयोजन केले होते. केंद्रीय सांख्यिकी आयोगाच्या यंदाच्या अहवालात बेरोजगारीची टक्केवारी इतिहासात नोंद होईल इतकी वाढल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.’’

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात युवक राष्ट्रवादी व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, युवकांना रोजगार देण्याकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी केला.

मोर्चात पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, मंजुषा गुंड, कपिल पवार, संजय कोळगे, माणिक विधाते, अभिजीत खोसे, वैभव ढाकणे, साहेबान जागीरदार, रेश्मा आठरे, शारदा लगड, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, अरविंद शिंदे, दीपक सूळ, किसन लोटके, गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, फारुख रंगरेज, बाबासाहेब गाडळकर, विपूल शेटीया, संजय सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारने मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, पंतप्रधान युवा योजनांचा नुसताच गाजावाजा करून रोजगार निर्माण केल्याचे फसवे चित्र निर्माण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 
कृषी क्षेत्राकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर शहराकडे वळले असून बेरोगारीत भर पडली आहे. मनरेगा मध्येही रोजगार नाही. निधी अभावी रोजगार हमीची कामे ठप्प झालेली आहेत. रोजगार हमीची 27 कोटीची कामे कागदावरच आहेत, असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादीची ही भव्य रॅली लक्षवेधी ठरली होती.