Breaking News

किसान सन्मान योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळवून द्या: शेंडगे


वाई  प्रतिनिधी : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ वाई तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केले.

वाई पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना शेंडगे बोलत होते. यावेळी सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. रमेश शेंडगे पुढे म्हणाले, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामध्ये अल्पभुधारक शेतकर्‍यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत 3 टप्यामध्ये ऊपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी गावातील कुटुंब निहाय वर्गीकरण करावे. ज्या कुटुंबाचे क्षेत्र 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार करून खातेदारांच्या नावावर दि. 1 फेब्रुवारी असलेले क्षेत्र विचारात घेऊन पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बॅक खाते क्रमांक, आधार कार्ड ते नसल्यास वाहन लायसेन्स, मतदान ओळख पत्र, रोजगार हमी योजनेचे कुटुंब ओळखपत्र यापैकी एक अशी सर्व माहिती एकत्रित करुन तहसील कार्यालयाकडून दिलेल्या फॉर्ममध्ये दि. 15 फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे. त्यानंतर ही माहिती 15 ते ,20 फेब्रुवारीपर्यंत आप आपल्या गावातील ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात प्रसिध्द करुन गावाच्या दरबारात मांडुन त्यावर कोणाच्या हरकती आहेत का याची खात्री करून काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबांची अंतिम यादी दि.20 ते 21 फेब्रबारीपर्यंत तहसिल कार्यालयात दाखल करण्याची जबाबदारी नेमून दिलेल्या प्रत्येक अधिकार्‍यांची राहणार आहे.

या योजनेत आजी माजी खासदार, आमदार, मंत्री, महानगर पालिकांचे महापौर, नगराध्यक्ष, जि ,प, चे अध्यक्ष व कुठलाही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आणि मागील वर्षात आयकर भरलेले निवृत्ती वेतनधारक ज्यांचे वेतन 10 हजार किंवा त्या पेक्षा जास्त आहे. डॉक्टर, वकील, अभियंता, चार्टर्ड उकाउंट, सनदी लेखपाल, वास्तुशास्त्रज्ञ, आर्किटेक अशा क्षेत्रातील कोणीही व्यक्ती या योजनेचा पात्र लाभार्थी असणार नाही, असे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस गटविकास अधिकारी ऊदयकुमार कुसुरकर, तालुका कृषी अधिकारी हरिचंद्र धुमाळ उपस्थित होते.