तीन सरकारी रुग्णालयांना डॉक्टरच नाहीत; सातार्‍यातील रुग्णांचा भरवसा जिल्हा रुग्णालयावर


सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहरात नगरपालिकेच्या अखत्यारित येणारी तीनही रुग्णालये ही डॉक्टरविनाच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका प्रशासनाच्यावतीने नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी हे दवाखाने आमच्याकडे येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही रुग्णालये नुसतीच शोपिस बनली आहेत. सातारकरांकडून चक्क रुग्णांची सेवा होत नसेल तर अशा रुग्णालयांना टाळा तरी लावावा किंवा चांगले डॉक्टर्स तरी द्यावेत, अशी मागणी होवू लागली आहे. दरम्यान सातार्‍यातील रुग्णांचा भरवसा जिल्हा रुग्णालयावरच अवलंबून असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ‘लक्ष्मीटेकड’, गोडोली येथीलही दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. तेथेही रुग्ण डॉक्टर नसल्याने परत फिरत होते.

उपस्थित कर्मचार्‍यांकडूनही डॉक्टर बाहेर गेलेत एवढेच सांगितले जात होते. वास्तविक सातारा शहरात सुमारे 21 झोपडपट्टया असून त्यातील गोरगरीब नागरिक औषधोपचार हे सरकारी रुग्णालयात घेतात. मात्र, शहरातील लक्ष्मीटेकडी, गोडोली आणि कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सर्वसामान्य रुग्णांची मदार आता जिल्हा रुग्णालयावरच पडत आहे. सातारा पालिकेकडे जेव्हा ही रुग्णालये होती, तेव्हा चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा दिली जात होती. याबाबत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आमच्याकडे या तीनही रुग्णालयांचे अधिकार नसून तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्याचे अधिकार आहेत. तर मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, आम्ही सुसज्ज इमारत बांधून दिली आहे. आरोग्य सेवा देण्याचे काम एनआरएचएमचे आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस म्हणाले, आम्ही जाहिरात काढली होती. डॉक्टरच येत नाहीत. सुपरव्हायझरच्या मुलाखती आता घेण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे सुपरव्हायझर तरी मिळतील. नगरसेविका प्राची शहाणे यांनी जोपर्यंत डॉक्टर मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget