कराडला आज विविध कार्यक्रम
कराड (प्रतिनिधी) : श्रीकृष्णाबाई घाट ट्रस्टतर्फे येथील कृष्णामाई घाटावरील कृष्णाबाई मंदिराशेजारी नवग्रह, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना रविवारी (दि.10) सकाळी होणार आहे.
करवीरपीठाचे सद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते आणि जयराम स्वामी वडगाव येथील मठाधिपती विठ्ठल स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती कृष्णाबाई घाट ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बुधकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. कराड हे धार्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेली ऐतिहासिक भूमी आहे. कृष्णा-कोयनेच्या तीरावर वसलेल्या कराड शहरांमध्ये 200 वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिरांची संख्या मोठी आहे. त्यात प्रथमच कृष्णाबाई घाटावर भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी नवग्रह, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचे मंदिर उभारण्याचे नियोजन कृष्णाबाई घाट ट्रस्टने केले आहे. कराडच्या इतिहासात प्रथमच विधीयुक्त 251 कलशांचे स्नान, महाआरती व महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळाही आयोजित केला आहे. त्यामध्ये शहर व परिसरातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे. मुख्य सोहळा रविवारी 10 रोजी सकाळी 7 पासून होणार असून त्यामध्ये होमहवन, नवग्रह अर्चना, ब्रह्मदेव अर्चना, पुजांग होम, मूर्ती प्रतिष्ठापना विधी, उत्तरांग होमहवन, पूर्णाहुती, मंत्रपुष्प आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
Post a Comment