Breaking News

वाई तालुका मेडीकल असो.ची सामाजिक बांधिलकी


वाई, (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील सर्व सामान्यांच्या जीवनात विविध उपक्रमाने सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या वाई तालुका मेडिकल असोशिएशनने ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन अध्यक्ष व केमिस्ट हृदयसम्राट आमदार जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाईमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाईच्या महागणपतीस अभिषेक करून आ. जगन्नाथजी शिंदे यांच्या हस्ते एक लाख 51 हजार रुपयांचा धनादेश पाचवड येथील मतिमंद मुलांच्या ‘आपुलकी’ या शाळेस देणगी देवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठानाचे जेवण देण्यात आले.

भुईंज येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 2 व वाई नगरपरिषद शाळा क्र. 6 मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्युरीफायर भेट दिला. त्याचबरोबर शनेश्‍वर देवस्थान सोळशी या ठिकाणी शनी भक्तांसाठी वाईतील डॉ. विद्याधर घोटावडेकर, प्रशांत पोळ यांच्या उपस्थितीत मुंबई येथील ओम दत्त ट्रस्ट मार्फत मोफत आरोग्य शिबीर घेवून औषधांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील महिलांसाठी कागदी पाकिटे व इतर गृहोपयोगी वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित करून महिला मेळावा घेण्यात आला. संस्थेच्या सभासदांसाठी दहा दिवसाचे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

दरवर्षीच असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम वाई मेडिकल असोशिएशनच्या वतीने राबवण्यात येतात. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो.संचालक व वाई केमिस्ट असो. अध्यक्ष अरूण पवार, सचिव प्रदिप मांढरे, खजिनदार प्रमोद शहा, उपाध्यक्ष विजयसिंह कणसे, सहसचिव अनिल चावलानी, संचालक संदीप भुतकर, देविचंद जैन, सुहास टपळे, सुनिल तरडे, नरेशओसवाल, सागर दळवी व सर्व सदस्यांनी योगदान दिले. व्यवसाय वृद्धीसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणारी एक अग्रगण्य संस्था हे ब्रीदवाक्य घेऊनच संघटना अनेक समाजिक कार्य करण्यात नेहमीच आघाडीवर असते, असे मत आ. शिंदे यांनी व्यक्त केले.