Breaking News

सरकारवर टीका केल्याने अमोल पालेकरांचे भाषण थांबविले


मुंबई : सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांची चिकित्सा केल्याने अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले. कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’मध्ये ते बोलत होते.

आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य कसे गमावले, पूर्वी आर्टच्या सल्लागार समितीत स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे, पण आता या समितीला संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेले, असे परखड मत पालेकरांनी यावेळी मांडले. मात्र, उपस्थितांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवत तुम्ही बर्वेंबद्दलच बोला, असे त्यांना सांगितले.
आयोजकांनी पालेकरांचे भाषण मध्येच थांबवल्याने, तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असा प्रश्‍न त्यांनी केला. यावर आम्ही तुम्हाला बर्वेंबद्दल बोलण्यास निमंत्रित केलं असल्याचे आयोजकांनी म्हटलं. यावर उत्तर देत पालेकर म्हणाले, असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं. ज्यावेळी सहगल यांना महाराष्ट्रात निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्या सद्यस्थितीवर बोलणार आहेत असं आयोजकांना समजताच त्यांनी हे निमंत्रण रद्द केलं. तुम्ही तशीच परिस्थिती निर्माण करत आहात ? असा सवाल पालेकरांनी यावेळी उपस्थित केला. या प्रसंगाचा दाखला देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा सरकारवर निशाणा साधला. ट्विट करून सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या आडून खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

भाषण करताना पालेकर यांनी कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलं. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले. गॅलरीच्या कामकाजावर आपली परखड मतं मांडत असतानाच मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे, असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं. अखेर अमोल पालेकरांनी तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं, असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं.

भाषणाची प्रत सेन्सॉर करणार का?
मुंबईच्या ’नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’मध्ये भाषण मध्येच थांबवण्यात आल्यानंतर भाषणाची प्रतदेखील सेन्सॉर करणार का? असा सवाल अमोल पालेकर यांनी रविवारी व्यक्त केला. हा प्रकार घडला त्यावेळी अध्यक्षही कार्यक्रमात हजर होत्या. त्यांनी भाषणापूर्वी माझ्याची बोलणे गरजेचे होते असे सांगितल्यावर मी भाषणाची प्रतदेखील सेन्सॉर करणार का, असा प्रतिप्रश्‍न केल्याचे पालेकर म्हणाले. त्यानंतर त्या कार्यक्रमस्थळावर निघून गेल्याचेही पालेकर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखलेदेखील उपस्थित होत्या.