Breaking News

पुरूषोत्तम जाधव लागले लोकसभेच्या तयारीला


कराड(विशाल पाटील / लोकमंथन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे नेते व ख़ंडाळा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कराड- पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी- भेटी घेवून बैठकांचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप- शिवसेना युतीकडून किंवा विरोधात लोकांना माहिती असलेले पुरूषोत्तम जाधव हे एकमेव उमेदवार असतील, असा निर्धार त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होत आहे.

पुढील महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार ठरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेते शोध घेत आहेत. तसेच कोणाचे किती वर्चस्व, संपर्क हेही पाहत आहेत. सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार हे खासदार उदयनराजे भोसले हे निश्‍चित मानले जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत ते भाजपमध्ये येतील अशी आशा भाजपच्या राज्यातील नेत्यांना होती. त्यामुळे अनेकदा राजकीय उलथापालथ होणार असे अनेक जाणकार सांगत होते. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांचे कधीच सौख्य जमले नाही, त्यामुळे उदयनराजे हे भाजपमध्ये जातील अशा बातम्या अनेकदा पसरत होत्या. मात्र या सर्व अफवा ठरणार असे आता दिसू लागले आहे. तसेच पुरूषोत्तम जाधव हेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भेटले तेव्हा रंगली होती. मात्र त्यानंतर खा. पवार व खासदार उदयनराजे एकाच गाडीतून आमदार शिवेंद्रराजें भोसले यांना घेऊन गेले आणि चित्र स्पष्ट होवू लागले.
दुसरीकडे आता राष्ट्रवादीतूनच उदयनराजे भोसले यांची तिसर्‍यांदा उमेदवारी निश्‍चित होणार हे असल्याचे जाणकारांतून सांगितले जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण ? अशावेळी केवळ पुरूषोत्तम जाधव यांचे एकमेव नांव हे भाजपाकडे असल्याचे दिसत आहे. पुरूषोत्तम जाधव यांनी यापूर्वीच वाई, खंडाळा, सातारा, कोरेगांव भागात आपला संपर्क ठेवला आहे. तसेच 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 2,35,068 मते ही शिवसेनेकडून घेतलेली होती. तर नंतर 2014 साली अपक्ष असतानाही देशातील नंबर एक क्रमांकची 1,55,937 इतकी मते मिळविली होती. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा अनुभव आणि मिळालेली मते यांचा विचार करता यंदा भाजप किंवा शिवसेनाही पुरूषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी देवू शकते, त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी ही उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर सुरू केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. मात्र सध्या शिवसेनेकडून कोणीही निवडणुकीची तयारीला लागले दिसत नाही. तसेच युती होईल असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शिवसेनच्या तिकिटावर लढलेले व सध्या भाजपमध्ये असलेले पुरूषोत्तम जाधव एकटेच सातारा लोकसभेला लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. त्यांनी काल पाटण तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. तेव्हा लोकसभेला राष्ट्रवादीच्या विरोधात सध्यातरी पुरूषोत्तम जाधव हेच एकमेव उमेदवार तयारीला लागले दिसत आहेत.
उरूल येथे भाजपाचे पाटण तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लहुराज पवार, अनिल बोधे, विजय पाटील, विनायक निकम, विक्रम माने, विवेक जाधव(कराड) यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.