Breaking News

उदयनराजे राष्ट्रवादीतून लढले तर सेनेचा विरोधच; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे प्रतिपादन


सातारा (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना व भाजपा युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी ताकदीने झोकून देवून काम करावे लागेल. दरम्यान लोकसभेसाठी खा. उदयनराजे भोसले हे ‘छत्रपती’ म्हणून लढले तर सातार्‍याची जागा बिनविरोध करु. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढले तर मात्र शिवसेना त्यांच्या विरोधात लढणारच, असा निर्धार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख व पदाधिकार्‍यांची बैठक ना. दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे- पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, हर्षल कदम, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार, रणजितसिंह भोसले, प्रताप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ना. दिवाकर रावते म्हणाले, सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात खा. उदयनराजे भोसले यांच्याशी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच चर्चा केली. त्यावेळी भाजपचे चार मंत्री त्यांना गराडा घालून बसले होते. तुम्ही ‘छत्रपती’ म्हणून निवडणुकीत उभे राहा. तुमच्याविरोधात कुणीच उभे राहिले नाही पाहिजे. ‘छत्रपतीं’चा सन्मान राहिलाच पाहिजे. कारण देशातील ही एकमेव अशी जागा असली पाहिजे की छत्रपतींची मान म्हणून जपला पाहिजे. मात्र, तुम्ही पक्ष म्हणून लढला तर आम्हाला त्यांच्याविरोधातही लढावे लागेल, असा इशाराही ना. रावते यांनी दिला. दरम्यान, या बैठकीत जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांकडून त्या त्या जिल्ह्याचा आढावा ना. दिवाकर रावते यांनी घेतला.

त्यावेळी ते म्हणाले, भाजपा सरकारकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचे नियोजन आहे. त्यातच सर्व पक्षांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. भाजपा व शिवसेनेची युती होणे कठीण आहे. मात्र युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी झोकून द्यावे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांत बैठका घ्याव्यात. पक्षाची बांधणी गावपातळीपर्यंत करावी. महाराष्ट्रातील प्रचाराची जबाबदारी उपनेते ना. नितीन बानुगडे-पाटील यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा झेंडा फडकणार यात शंकाच नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातही भगवा फडकवायचा असल्याने शिवसैनिकांनी ताकदीने काम करावे. शिवसेनेच्यावतीने लवकरच जिल्ह्यात सभासद नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या बुथप्रमुखांनी जिल्ह्यात गावोगावी सभासद नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, अशा सुचनाही ना. रावते यांनी पदाधिकार्यांना दिल्या.