Breaking News

कोयनानगरला प्रकल्पग्रस्तांचे आजपासून निर्णायक ठिय्या आंदोलन


कोयनानगर (प्रतिनिधी) : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक आंदोलनास मंगळवार (दि. 12) पासून पुन्हा एकदा सुरवात होत आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून कोयनानगर येथील छ. शिवाजी स्टेडीयम येथे आंदोलन होत आहे. मागील आंदोलनात मान्य झालेल्या मागण्यांची कार्यवाही आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा ठाम निश्‍चय प्रकल्पग्रस्त जनतेने केला आहे, तसेच समन्यायी पाणी वाटपाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील संघटनांचा पाठिंबा देण्यासाठी 11 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होत आहे.

गेल्यावर्षी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या तिसर्‍या आणि चौथ्या पिढीतील तरुणांनी सातारा येथे चार दिवस आणि कोयना येते तेवीस दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी कोयना प्रकल्पग्रस्तांची बैठक विधानभवनात घेतली आणि चौदा मागण्या मान्य केल्या. या मागण्यांची तीन महिन्यात अंमलबजावणी करावी असे आदेशही दिले. मात्र जिल्हा महसूल प्रशासनाने कासवाच्या गतीने काम चालू ठेवले आहे. त्यास दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. दुर्लक्षित आणि आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहीलेल्या प्रकल्पग्रस्तांची तरुणपिढी मात्र खडबडून जागी झालेली दिसत आहे.

कोयना प्रकल्प निर्मितीवेळी जमीन संपादन करून हजारो खातेदार जमीन मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना जमिनी मिळाव्यात, शेतीसाठी योग्य जमीन आणि जमिनीस पाण्याची सोय व्हावी, निर्वाह भत्ता, नोकरीत प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांची होणारी ससेहोलपट थांबवून त्यांना सहकारी तत्त्वावरील कारखाने, शिक्षण संस्था आणि इतर ठिकाणी नोकर्‍या मिळाव्यात, पर्यटन व्यावसायासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रोत्साहन देऊन हा व्यवसाय निर्माण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, त्याचबरोबर अनेक मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त निर्णायक आंदोलनासाठी मंगळवार (दि. 12) फेब्रुवारीपासून बसत आहेत.