Breaking News

पाचगणी येथून पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून परदेशी नागरिकाचा मृत्यू


वाई (प्रतिनिधी) : पाचगणी येथून पॅराग्लायडिंगचे उड्डाण करून धोम धरण परिसरातील गाडवेवाडी गावच्या हद्दीतील पायटा नावाच्या शिवारात मनोरंजनाचा खेळ करताना डोंगराला धडकून गंभीर जखमी झालेल्या कोरियन नागरिक सॅनटेक ओ वाई मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान परदेशी नागरिकाच्या मृत्यूला जबाबदार धरुन मुंबई येथील इंडियन पॅराग्लायडिंग ऑर्गनायझेशनचे प्रमुख असलेले विस्टाज खरात यांना पाचगणी पोलिस ठाण्याच्या महिला सपोनि तृप्ती सोनावणे यांनी अटक केली.

आपल्या सहकार्‍यांसह मुंबई येथून संबंधित कोरियन नागरीक पाच दिवसांच्या टूरवर पाचगणी येथे आला होता. पाचगणी येथून पॅराग्लायडिंगचे उड्डान केल्यानंतर अभेपुरी गावच्या हद्दीत डोंगराला धडकून संबंधित नागरिक जखमी झाला होता. त्यास वाईतील मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. कोरियन दूतावसाचे अधिकारी वाईत आले होते. आज सकाळी शवविच्छेदन करून व परदेशी नागरिक असल्याने सोपस्कर पूर्ण करून मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक बी. बी. येडगे करत आहेत. प्रथम तक्रार वाई पोलिस ठाण्यात झिरो नंबरने दाखल होऊन ती पुढील तपास करण्यासाठी पाचगणी पोलिस ठाण्यात पाठविण्यात आली आहे.

याबाबत सपोनि तृप्ती सोनावणे यांनी दिलेली माहिती अशी, सॅनटेक ओ हे रिपल्वीऑफ कोरिया येथील ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांना मुंबई येथील इंडियन पॅराग्लायडींग ऑर्गनायझेशनचे प्रमुख असलेले विस्टाज खरात यांनीच या मनोरंजनाच्या खेळासाठी मित्रांसमवेत पाचगणी या पर्यटनस्थळी बोलावले होते. त्यांना पॅराग्लायडींगची आवड होती. पाचगणी हा परिसर यासाठी योग्य असल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी यासाठी लागणारे साहित्य विस्टाज खरात यांच्याकडुन घेतले. ते राजपुरी गावातील डोंगरावर पोहचले आणि दि.12 रोजी त्यांनी दुपारी पॅराग्लायडींग हा खेळ खेळायला डोंगरावरुन उडी मारून सुरवात केली पण सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील धोम धरण परिसरातील असणार्‍या गाडवेवाडी गावच्या हद्दीतील पायटा नावाच्या शिवारातील निरमनुष्य ठिकाणच्या डोंगराला वेगाने जाऊन आदळल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला.
दरम्यान या घटनेमुळे पाचगणी, महाबळेश्‍वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने पर्यटकांच्या जिविताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.