Breaking News

दखल- नंदनवनातील गूड न्यूज!


काश्मिरी युवकांना देशातील 11 राज्यांत मारहाण करण्यात आली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असं म्हणायचं आणि त्याचवेळी काश्मिरींना अपमानस्पद वागणूक देऊन, त्यांच्या व्यवसायावर गडांतर आणायचं यामुळं काश्मिरींना आपण देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर करतो आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे. काश्मिरींना मुख्य प्रवाहात ठेवण्याचा शीख समुदायानं जो निर्णय घेतला, त्याचं स्वागत करायला हवं.


काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे 40 जवान शहीद झाले. हा आत्मघाती हल्ला घडविण्यामागं स्थानिक अतिरेकी आलीम दार याचा हात होता. त्यामुळं काश्मीरच्या स्थानिक नागरिकांविरोधात देशभर असंतोष आहे. वास्तविक मूठभर लोक दोषी असतात, याचा अर्थ सर्व संमाजच दोषी असतो, असं नाही. मूठभर दोषींना शिक्षा करण्याचा आग्रह जरूर धरला पाहिजे; परंतु त्याचबरोबर इतरांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षताही घेतली पाहिजे. दार याच्या आत्मघाती हल्ल्यानंतर जेव्हा त्याच्या कुटुबीयांचं अभिनंदन करण्यासाठी काही काश्मिरी, फुटीरतावादी गेले, तेव्हा त्यांनी संबंधितांना चांगलंच खडसावलं. जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आपल्या मुलाविषयी त्यांच्या मनातील संताप व्यक्त होत होता. त्यानंतर याच हल्ल्याच्या मास्टर माईंडचा ठावठिकाणा सांगणारेही स्थानिक होते, याचा आपल्याला विसर पडला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे आदेश दिले; परंतु तरीही देशभर हल्ले होत राहिले. अखेर सर्वोच्च न्यायालयाच त्यात हस्तक्षेप करावा लागला. असं असताना केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना असे हल्ले झाल्याचं आढळत नाही. त्यांना हा कांगावा वाटतो. आपल्या ज्येष्ठ सहकार्‍याचं त्याबाबतीतलं म्हणणं त्यांनी लक्षात घेतलं असतं, तरी त्यांच्याकडून अशी चूक झाली नसती. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं शीख समुदाय काश्मिरी विद्यार्थ्यांच्या मागं खंबीरपणे उभा राहिला. देशात अतिरेक्यांचा त्रास जेवढा काश्मिरी आणि पंजाबी समुदायाला सहन करावा लागला, तेवढा अन्य कुणालाच नाही. पाकिस्ताननं पंजाब आणि काश्मीरमध्येच दहशतवादी पाठवून वेगवेगळे हल्ले घडवून आणले. ही दोन राज्यं भारतापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी काश्मिरी तरुणांवर असे हल्ले होत असतानाच शीख समुदायातील तरुणांनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता काश्मीरमध्ये अनेक स्थानिकांनी शीख समुदायातील लोकांसाठी मोफत सेवा देऊ केली आहे. देशभरात काश्मिरी तरुणांना मारहाणीच्या घटना होत असताना त्यांच्या मदतीला धावलेल्या शीख समुदायाची काश्मिरी लोक उपकाराची सेवेतून परतफेड करीत आहेत. 


20 फेब्रुवारी संध्याकाळपासून काश्मीरमधील सोशल नेटवर्किंगवर शीख समुदायातील तरुणांसाठी मोफत औषधं, होम स्टे, स्नो बाईक राईड, वैद्यकीय तपासणी, अ‍ॅडमिशन, इंग्लिश स्पिकींग कोर्सेससारख्या ऑफर्स स्थानिकांनी पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. या ऑफर्सबरोबरच शीख तरुणांसाठी रक्तदान तसंच अगदी किडनी दान करण्यासही काश्मिरी तरुण तयार झाले आहेत. एकीकडं ‘सोशल मीडिया’वरूनही काश्मिरी तरुणांना धडा शिकवण्याची भाषा बोलली जात असतानाच अनेक ठिकाणी शीख समाजातील तरुणांनी काश्मिरी तरुणांना मदतीचा हात पुढं केला. अनेक शहरांमध्ये काश्मिरी तरुणांच्या वसतिगृहाबाहेर शीख तरुणांनी पाहरा दिला. अंबाला, डेहराडूनसारख्या शहरांमधून शीख तरुणांनी असुरक्षित वाटणार्‍या काश्मिरी लोकांना परत पाठवण्यासाठी विशेष बसची सोय केली होती. शीख तरुणांनी काश्मिरी तरुणांना मदत करण्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. त्यामुळं आता काश्मिरी तरुणांनी शीख तरुणांसाठी मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आपण अमुक अमुक क्षेत्रात काम करतो, या संदर्भात शीख तरुणांना काही मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, अशाप्रकारचे अनेक ट्विटस काश्मिरी तरुणांनी पोस्ट केले आहेत. या मदतीबद्दल बोलताना जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचा प्रवक्ता नासीर खुहेमी म्हणतो, ‘देशात काश्मिरी तरुणांवर काही शहरांमध्ये हल्ले होत असताना शीख तरुणांच्या मदतीशिवाय त्यांना त्या शहरांमधून बाहेर पडता आले नसते. काश्मिरी तरुण सुखरुप घरी घेण्यामध्ये शीख तरुणांचा मोलाचा वाटा आहे.’ ब्रिटनमधील शीखांनी स्थापन केलेल्या संस्थांनी आमच्याशी संपर्क साधून डेहराडून आणि अंबाला सारख्या शहरांमधून काश्मिरी स्थानिकांना राज्यात परत आणण्यासाठी मदत केल्याचं नासीर सांगतो. युद्ध, नैसर्गिक संकटं, आपत्तीच्या वेळेस या संस्थेमार्फत सामान्य जनतेला त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदत पुरवली जाते. देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून काश्मिरी तरुणांना मारहाण होण्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला अशा तरुणांचे मदतीसाठी फोन येऊ लागले, तेव्हा आम्ही या काश्मिरी तरुणांना त्यांच्या घरी पोहचवण्याची सोय केल्याचं संस्थेचा भारतातील प्रमुख गुरप्रित सिंग सांगतो. चंदीगडवरून जवळजवळ 300 काश्मिरी तरुणांना त्यांच्या राज्यात सुरक्षितरित्या परत पाठवण्यात आल्यानं गुरप्रित यांनी सांगितले. स्थानिक गुरुद्वारांमध्ये या काश्मिरी तरुणांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती, अशीही माहिती गुरप्रित यांनी दिली.
शीख तरुणांनी केलेल्या या मदतीनंतर आता काश्मिरी तरुणांनी त्याची परफेड करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये दवाखाना असणार्‍या इम्तियाज अहमद वाणी यानं आपल्या दवाखान्यात येणार्‍या शीख रुग्णांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्तियाज वर्षभरासाठी शीख रुग्णांची मोफत सेवा करणार आहे. ‘काश्मिरी तरुणांना त्यांच्या राज्यात सुखरुप परत येण्यासाठी मदत करणार्‍या शीख बांधवांचा मी खूप आभारी आहे. वर्षभरासाठी शीख रुग्णांना मोफत सेवा देऊन मी त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं धन्यवाद देण्याचा निर्णय घेतला आहे’ असं इम्तियाज सांगतो. इम्तियाजप्रमाणेच अनंतनागमध्ये स्वत:चं गॅरेज असणार्‍या मुदाशीर अहमद यांनीही शीख समुदायातील लोकांच्या चारचाकी गाड्या दुरुस्त करुन देण्यासाठी आणि धुण्यासाठी कोणत्याही प्रकारची मजुरी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तुमच्याकडं प्रेमानं कोणी एक पाऊल पुढं टाकत असेल, तर तुम्ही दोन पावलं पुढं टाकली पाहिजेत, यालाच माणुसकी म्हणतात. या माध्यमातून हिंदू, मुस्लिम, शीख बांधवांनी एकत्र येऊन आपल्यातील एकता दाखवून दिली पाहिजे’, असं अहमद सांगतो. स्थानिक वृत्तपत्रांनीही व्यंगचित्रांच्या माध्यमातून शीख समुदायाला धन्यवाद म्हटलं आहे. ग्रेटर काश्मीर नावाच्या वृत्तपत्रानं आपल्या व्यंगचित्रामध्ये बोटीत बसलेली शीख व्यक्ती पाण्यात बुडणार्‍या काश्मिरी तरुणाला हात देतानाचं व्यंगचित्र छापलं होतं.


काश्मीरमधील ऑल पार्टीज शीख कॉर्निडेशन कमिटीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना यांनी काश्मिरी स्थानिकांच्या प्रेमाबद्दल त्यांना धन्यवाद म्हटलं आहे. ‘2014 साली पूर परिस्थितीदरम्यानही स्थानिक काश्मिरी जनतेनं आम्हाला मशिदीमध्ये आसरा दिला होता. जेव्हा जेव्हा इथं नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा काश्मिरी लोक मोफत जेवणाची तसेच इतर गोष्टींची सोय करतात. बाहेरचे लोकं काहीही म्हणत असतील; पण काश्मीरमधील धर्मनिरपेक्षता आम्हाला ठावूक आहे,’ असं मत जगमोहन यांनी नोंदवलं आहे. काश्मीरमधील स्थानिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून खालसा संस्थेनंही आनंद व्यक्त केला आहे. ‘मनुष्याची सेवा करणं, याच उद्देशानं आम्ही त्या काश्मिरी तरुणांची मदत केली होती. त्याबदल्यात आम्हाला कोणताही मोबदला अपेक्षित नव्हता; पण ज्याप्रकारे काश्मीरमधील मुस्लिम बांधवांनी तेथील शीख बांधवांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामधून देशामध्ये बंधुता वाढवण्याचा संदेश जाईल याचा आम्हाला आनंदआहे,’ असं मत गुरप्रित सिंग यांनी व्यक्त केलं आहे. देशप्रेमाचं दुसरं नाव यापलीकडं असू शकत नाही.