Breaking News

दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करा तहसीलदारांना मनसेचे निवेदन


शिरूर/प्रतिनिधी
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना जाहीर केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरुर तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील दुष्काळी उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना जाहीर केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्दशनास आले आहे. सर्वच उपाय योजना लाभार्थी शेतकर्‍यांपर्यंत अजुनही पोहचविल्या जात नाहीत.
त्यामुळे शेतकर्‍यासह सर्व सामान्य माणूस देखील हवालदिल झाला आहे. या योजनेचा लाभ व शेतमालाला बाजार भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुष्काळी उपाय योजना फक्त कागदावरच दिसत असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व उपाय योजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करत शेतकर्‍यांना जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या विज बिलात 33.50 टक्के सुट, शालेय महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची विज खंडीत न करणे वरील सर्व सवलती ज्या लाभार्थी शेतकरी यांना देण्यात आल्या आहेत. त्यांची सविस्तर लेखी माहिती लाभार्थ्यांच्या नावासह यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहिरी अधिग्रहीत केल्या किती टँकर लावले याची सविस्तर माहिती द्यावी. तालुक्यातील एकुण जलसाठा व तालुक्यातील पशुधनास एप्रिल 2019 पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चारा उपलब्धतेबाबत माहिती सुद्धा देण्यात यावी. अनुदानित अन्नधान्यासाठी पात्र असलेल्यांना शिधापत्रिका त्वरित बनवून द्यावी. दुष्काळी गावातील अपंग, विधवा, निराधार, वृद्ध, अत्यंत पिडीत अशा लोकांसाठी सामुहीक स्वयंपाक घर सुरु करण्यात यावे.
तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या गाई-म्हशी विकत घेणे, शेळी पालन, कुक्कुट पालन, शेड-नेट हाऊस, पॉली हाऊस, मिनी डाळ मिल, पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर, ट्रॅक्टर व अवजारे, पॉवर टिलर योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सर्व माहिती 7 दिवसांच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुकाध्यक्ष कैलास नरके, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, मनसे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनविसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, उपाध्यक्ष विकास साबळे, प्रविण तुबाकी, चित्रपट सेना मनसेचे गणेश जगताप, तालुका महिला आघाडी डॉ.वैशाली साखरे आदी उपस्थित होते.