Breaking News

एकाच रात्री पाच ठिकाणी धाडसी चोरी

शहरटाकळी/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व परिसरातील देवटाकळी येथे रविवारी रात्री चोरट्याने पाच ठिकाणी धाडसी चोरी केली. रोख मुद्देमाल व चीज वस्तू चोरी गेल्या आहेत.

रविवारी रात्री शहरटाकळी येथे बसस्थानका जवळील रामचंद्र मोहन गिरम यांच्या शिवम कलेक्शन या दुकानाचे शटर तोडून दुकानातील गल्ल्यातील रोख 10 ते 12 हजार रुपये व काही चीज वस्तू चोरी गेल्या. जवळीलच दत्तात्रय गवळी यांच्या गुरुदत्त कलेक्शन व शंकर गोसावी यांच्या ओम कृषी सेवा केंद्र या दुकानाच्या शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून सामानाची उचकपाचक केली. तेथे जवळच असलेल्या विशाल गवारे यांच्या साईसिद्धी पतसंस्थेचे मुख्य शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून आतील दोन दरवाजे तोडून चोरट्यांनी तिजोरी पर्यंत प्रवेश केला. या ठिकाणी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, कॅश काउंटर गल्यातील रक्कम चोरी गेल्याचे समजते. तसेच परीसरातील देवटाकळी नसीर सय्यद यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व चीज वस्तू घेवून चोरट्यांनी पोबारा केला.
शेवगाव पोलिस स्टेशन कडून सदरील चोरींचा पंचनामा केला आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

पोलिस दूर क्षेत्र सुरु करण्याची मागणी
चोरांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शहरटाकळी येथे असलेले पोलिस दूर क्षेत्र शहरटाकळी येथे ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर लवकरच सुरु करून पोलिस प्रशासनाने परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.