Breaking News

सर्वोच्च न्यायालय भाजपच्या मालकीचे आहे का? - काँग्रेस


बंगळूर : धर्मनिरपेक्षन जनता दलाच्या आमदाराला आमिष दाखविल्याच्या संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ कर्नाटकचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले. कोणत्या हेतूने ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींशी संपर्क साधून खटला व्यवस्थित करण्यासाठी चर्चा करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अमित शाह यांनी आश्‍वासन दिले आहे का? सर्वोच्च न्यायालय भाजपच्या मालकीचे आहे का?, असे सवाल काँग्रेसने केले.

या ‘ऑडिओ क्लिप’मध्ये 50 कोटी रुपये देऊन विधानसभा अध्यक्षांना बुक केले आहे. तसेच पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बुक केले आहे. 25 कोटी रुपये तुम्हाला मिळतील, असे आमिष धर्मनिरपेक्षन जनता दलाच्या आमदाराला दाखविले आहे. या संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती.

हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरत काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवणे हेच भाजपचे लक्ष्य आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. मोदी आणि शाह हेच कर्नाटकातील युतीचे सरकार पाडण्यासाठीच्या प्रयत्नात होते. या प्रकरणाची सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी स्वेच्छा दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

गुलबर्ग्यातील गुरुमिटकल येथील नागनगौडा कंदकूर यांना आमिष दाखविण्यात आले. आमदारपुत्र शंकरगौडा यांच्याशी येदियुराप्पांनी संवाद साधला. मुंबईत नाराज आमदार एकत्र आहेत. आणखी चार दिवसांत सरकार कोसळेल, त्यामुळे वडिलांना राजीनामा देण्यास सांग, असे येदियुराप्पांनी शंकरगौडा यांना सांगितले. याबाबतची सर्व माहिती ऑडिओमध्ये आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभा सभापतींकडे येदियुराप्पांविरूद्ध लेखी तक्रार केली आहे.