Breaking News

येरळवाडीतील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान


वडूज (प्रतिनिधी) : येरळवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला विहिरीत उतरून येथील युवा सोशल फाउंडेशनच्या युवक कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. विशेष म्हणजे 50 फूट खोली असलेल्या या विहिरीला पायर्‍याही नाहीत. अशा विस्तीर्ण विहिरीत दोरीच्या सहहायने युवक पाण्यात उतरले होते. याबाबत अधिक माहिती येथील सोमनाथ जाधव हे आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांना विहिरीतून कोल्ह्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना विहिरीत कोल्हा असल्याचे दिसून आले. दरम्यान याबाबत त्यांनी युवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जाधव यांना माहिती दिली. यावेळी रात्री 8 च्या सुमारास बॅटरीच्या सहहायने या सोशल फाउंडेशनचे युवक विहिरीत उतरले. यावेळी पाण्यात पडलेल्या या कोल्ह्याला या युवकांनी दोरीच्या सहहायने विहिरीतून बाहेर काढले. यावेळी वनविभागाचे आनंदराव चव्हाण, महेश पाटोळे व या फाउंडेशनचे श्रीधर जाधव, अक्षय दुबळे, उमाजी जाधव, अपासाहेब देवकर, पंजाब जाधव, श्याम मंडले, नवनाथ जाधव,प्रवीण बागल, मदुसुधन जाधव, नितीन जाधव यांनी या कोल्ह्याला बाहेर काढून सोडून दिले. या कार्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.