Breaking News

काँग्रेस जिंकल्यास जातीयवाद बोकाळेल; भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा आरोप;


पुणे / प्रतिनिधीः
भारतीय जनता पक्षाने 2014 पासून 2019 पर्यंतच्या काळात देशातील घराणेशाही मोडीत काढली आहे. जात पात सोडून कामकाज केले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे सरकार निवडून आल्यास देशात जातीयवाद बोकाळेल, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

पुण्यातील भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शाह बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब भेगडे, संघटक मकरंद देशपांडे, महामंत्री सुजित ठाकूर उपस्थित होते.

ते म्हणाले, की लोकसभेची आगामी निवडणूक देशाची भविष्यातील वाटचाल दर्शवणारी आहे. जातीयवाद, परिवारवाद याला नाकारून विकास करणार्‍या नेतृत्वाला पुढे नेणारी ठरणार आहे. विकासाच्या राजनीतीवर हा देश मोदींच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणार आहे. गेल्या सत्तर वर्षातून 55 वर्षे गांधी घराण्याने देशावर शासन केले; पण देशातील नागरिकांमध्ये काहीच परिवर्तन केले नाही. हे परिवर्तन मोदींनी केवळ 55 महिन्यात केले. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी केलेले कार्य, दिलेला निधी आणि त्यापूर्वी शेतकर्‍यांसाठी झालेले कार्य व दिलेला निधी याची आकडेवारी शरद पवारांनी जाहीर करावी. तुम्ही 10 वर्षात 53 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आम्ही वर्षात 75 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले.


राहुल गांधी यांना तर बटाटा जमिनीच्या वर येतो, की जमिनीमध्ये येतो, हे सुद्धा माहीत नाही, अशा शब्दात खिल्ली उडवली. राज्यात 45 पेक्षा कमी जागा जिंकल्या, तर त्याला विजय म्हणता येणार नाही. 45 जागांमध्ये बारामती जागेचा समावेश असायलाच पाहिजे, असा संकल्प आपण केला पाहिजे. हाच संकल्प घेऊन आपण येथून बाहेर पडले पाहिजे, असे शाह म्हणाले.

राम मंदिराचा मुद्दा सोडला नाही

अयोध्येमध्ये त्याच जागेवर भव्य मंदिर उभारण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. या मुद्द्यावरून आम्ही बाजूला झालो नाही. न्यायालयात प्रकरण आसल्याने आम्ही थांबलो आहोत. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर करावे, राम मंदिर राम जन्मभूमीच्या ठिकाणी व्हावे, की नाही, असा सवाल शाह यांनी केला.