Breaking News

शनिशिंगणापूर झालंय अवैध धंद्यांचा अड्डा!


नेवासे/प्रतिनिधी : जगाच्या पाठीवर एक आश्‍चर्यकारक आणि जागृत देवस्थान म्हणून उदयास आलेल्या शनिशिंगणापूरच्या वाट्याला सध्या प्रचंड बदनामीचे दिवस आले आहेत. स्थानिक पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तामुळे येथे कल्याण-मुंबई आँनलाईन जुगारासह बिंगो जुगाराचं मोठं पेव फुटलं आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर हे तिर्थक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचा जणू अड्डाच झालंय. नव्यानं बदलून आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची वक्रदृष्टी या अवैध धंद्यांवर पडणार का, असा यक्षप्रश्‍न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.

शनिशिंगणापूरला जगाच्या पाठीवर एक आगळे वेगळे महत्त्व आहे. झाडांची अथवा घराची सावली चालत नसलेले देवस्थान तसेच चोरी न होणारं गाव अर्थात येथे चोरी होत नसल्याची अख्यायिका असली तरी अवैध धंद्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम स्थानिक पोलिस आणि अवैध धंदेचालकांच्या ’मिलीभगत’मुळे येथे जोमाने सुरु आहे. शनिदेवाच्या मंदीराच्या अगदी पाठीमागे खासगी मालकीच्या जागेत आँनलाईन मटका गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. स्थानिक पोलिसांना मिळत असलेल्या हप्त्यामुळे या धंद्याला चांगल्याप्रकारे अभयदान मिळत आहे.

विशेष म्हणजे अवैध धंद्यांच्या जोडीला येथील विशिष्ट लाँजवर ’जोडी’ने येत असलेल्या गिर्हाईकांमुळे पावित्र्य धोक्यात आले आले आहे. मोठमोठ्या शहरात सुरु असलेल्या देहविक्रयाचे चाळे या लाँजवर सुरु आहेत. परिणामी येथे येत असलेल्या भाविकांमध्ये ’आंबटशौकिन’ मंडळींचे प्रमाण मोठे आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे ज्याठिकाणी पोलिस अधिकारी वास्तव्य करत आहेत, अगदी त्याच परिसरात असलेल्या एका लाँजमध्येच हे असले धंदे सुरु आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकारी मात्र हे सारे पाहून आंधळे आणि ऐकून बहिरे झाले आहेत. त्यामुळेच शनिशिंगणापूरची होत असलेली मलिन प्रतिमा सुधारण्यासाठी नव्या पोलीस अधीक्षकांनी येथे येऊन दांडके हातात घ्यावं, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.

’त्या’ अधिकार्यांविरुध्द कारवाई होणार का?
ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत, त्या अधिकार्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई (पगारवाढ रोखणे, बढती थांबविणे आदी) रिटायरमेंटला थोडाच कालावधी शिल्लक असलेल्या येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्याविरुद्ध नवे एसपी अशी कारवाई करतील का, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.

मँनेजरची कमालीची अनभिज्ञता
ज्या खासगी जागेत कल्याण-मुंबई या मटक्याच्या माध्यमातून दररोज तब्बल पन्नास हजार रुपयांची उलाढाल होत आहे, ती जागा देवस्थानच्या मँनेजरची असल्याची माहिती आहे. येथील लटकू आणि इतर कामगार दिवसभर काम करुन सायंकाळी शनिदेवाच्या आरतीनंतर कष्टाची कमाई व्यर्थ उधळवित आहेत, या सर्व प्रकारांकडे याविषयी हे मँनेजर महाशय कमालीचे अनभिज्ञ असल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.