Breaking News

शिर्डी लोकसभेतून काँग्रेसचाच खासदार – थोरात


संगमनेर/प्रतिनिधी: अनेक फसव्या घोषणा करुन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकार विरोधात जनतेत मोठा संपात आहे. काँग्रेस हा देशातील गोर गरिबांचा व सर्व सामान्यांच्या विकासाचा विचार करणारा पक्षा आहे. या विचारातून देशाचा विकास व्हावा यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचे हात बळकट करतांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले  .
आश्‍वी बु येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर हे होते तर व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे, अ‍ॅड.माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, सौ.निशाताई कोकणे, नवनाथ अरगडे, शंकरराव खेमनर, अमित पंडीत, भाऊसाहेब कुटे, सतिषराव गोडगे, गणपतराव सांगळे, बाळकृष्ण जराड, रामहरी कातोरे, मिलींद कानवडे, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहूल जराड , के.के.थोरात, नारायण कहार, विजय हिंगे, हौशीराम सोनवणे, बाबा ओहोळ, विश्‍वासराव मुर्तडक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन व दुध संघाच्या बल्क कुलरचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना थोरात म्हणाले  आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पाईक असून तालुक्यातील जनतेने कायम काँग्रेसचा विचार जोपासला आहे. संगमनेर तालुक्यातील संस्था ह्या पारदर्शक व गुणवत्तापुर्ण कारभारातून सक्षमपणे उभ्या आहेत. कारखाना, दुध संघ राज्यात पहिल्या क्रमांकावर असून आपल्याकडे कधीही विकासात भेदभाव केला जात नाही. प्रामाणिक व सरळ राजकारण हे तालुक्याचे वैशिष्ट्ये आहे. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले. या मेळाव्यास परिसरातील सभासद,ऊस उत्पादक व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना आ.बाळासाहेब थोरात