Breaking News

जिल्हा रूग्णालयात जागतिक युनानी दिनी कार्यक्रम


अहमदनगर/प्रतिनिधी : “सध्याच्या काळात अनेक कारणांनी वेगवेगळे आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे, अशावेळी अनेक आजारांवर यशस्वी उपचार करणार्‍या व निसर्गाशी अनुरुप अशा आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी चिकित्सा पध्दती रुग्णांसाठी परिणामकारक ठरणार आहेत, आजारांवर चांगले उपचार होण्याबरोबरच मुळात आजार होऊच नये यासाठीही या पारंपरिक चिकित्सा पध्दतीने खूप चांगल्या गोष्टी आहेत, युनानी उपचार
पध्दतीही निसर्गानुरुप असल्याने सहसा दुष्परिणाम होत नाही, जुनाट आजार तसेच कायमस्वरुपी औषधोपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी युनानी चिकित्सा लाभकारक आहे’’, असे प्रतिपादन कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. चाबुकस्वार यांनी केले.

जागतिक युनानी दिनानिमित्त सोमवारी (दि.11 फेब्रुवारी) अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.चाबुकस्वार बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात युनानी चिकित्सेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. यावेळी युनानी तज्ज्ञ डॉ. खालीद शेख, डॉ.जहीर मुजावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.दादासाहेब साळुंके, सहायक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.ज्योती तनपुरे, डॉ. शौनक मिरीकर, डाॅ.नाझीया शेख, डॉ.अब्दुल बासीत, डॉ.उबेद खान, डॉ.वाहिद खान, डॉ. सादिक कुरेशी, डॉ. सबीना शेख, डॉ. नजमा मुजावर आदी उपस्थित होते.
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी आयुष विभागामार्फत उपलब्ध वैद्यकीय सेवांची माहिती दिली. डॉ.नाजीया शेख यांनी युनानी उपचार पध्दतीने बर्‍या झालेल्या तसेच नियंत्रणात आलेल्या दुर्धर आजारांबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागात युनानी उपचार घेणारे रुग्ण अ‍ॅड. शहा मॅडम, कुंदनलाल पापडेजा, करिश्मा शेख यांनीही उपचारांबाबत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.ज्योती तनपुरे यांनी केले. प्रास्ताविक आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शौनक मिरीकर यांनी केले. आभार युनानी तज्ज्ञ डॉ. नाझीया शेख यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. इरशाद मोमीन, डॉ. सादिक शेख, योगतज्ज्ञ मोहिनी जाधव, माधुरी ठोंबरे, आदींनी परिश्रम घेतले.