Breaking News

भाग्यश्री माने हिचा खून अंधश्रधदेतून? संशयित म्हणून वडिल ताब्यात


ढेबेवाडी, दि. 9 (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील कु. भाग्यश्री संतोष माने (वय 18) हिच्या गळा चिरून खून झाल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. या प्रकरणातील संशयितास पोलिसांनी अटक करावी म्हणून नाभिक समाजाने राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान, या खूनातील संशयित म्हणून पोलिसांनी तिच्या वडिलांना ताब्यात घेतल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कु. भाग्यश्री हिचा खून अंधश्रध्देतून झाला असल्याची माहिती समोर येवू लागली आहे.


पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री हिचा 22 जानेवारी रोजी गळा चिरून खून झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यादिवशी सकाळी कु. भाग्यश्री तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारपर्यंत ती घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेण्यास सुरूवात केला होता. तेव्हा करपेवाडी ते तळमावले येथील जवळचा रस्ता असलेल्या पाणंद रस्त्यालगतच्या शेतात तिचा गळा चिरून खून केल्याचे अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर तिचा मृतदेह कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणला असता तेथे नाभिक संघटनांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, लवकरात-लवकर संशयितास पोलिसांनी शोधून काढावे म्हणून राज्यभर नाभिक संघटनानी आंदोलने, बंद पुकारले होते.


संशयिताने कोणताही पुरवा न ठेवता हे कृत्य केल्याने या घटनेचा छडा लावणे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते. त्यामध्ये ढेबेवाडी पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे विभागाने तपास सर्व बाजूंनी सुरू ठेवला आहे. प्रत्येक संशयिताकडे गुप्तपणे पोलीस चौकशी करत आहेत. तपासकामी भाग्यश्री हिच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अंधश्रध्दतून हा खून झाला असल्याच्या मुद्द्यावरून चौकशी सुरु असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांना काय करावे लागणार? तपास यंत्रणा कोणत्या दिशेला वळणार याविषयी नाभिक समाज तसेच राज्यभर चर्चा सुरू राहणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे करत आहेत.