जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी गंभीरच; वसुली मोहीम आणखी आक्रमक करा : संजय ताकसांडे


सातारा (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये सातत्य नसल्याने थकबाकीची स्थिती विदारक आहे. वीजबिल दरमहा थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वसुलीची मोहीम आणखी आक्रमकपणे राबवावी, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.

येथील महावितरण मंडल कार्यालयात सातारा जिल्ह्यातील 650 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) शंकर तायडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अलोक गांगुर्डे, बारामती मंडलाचे प्रभारी अधीक्षक अभियंता उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय ताकसांडे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. परंतु, त्यामध्ये अपेक्षित सातत्य नाही. परिणामी थकबाकी वाढत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सर्व अभियंते व जनमित्रांनी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही. या मानसिकतेप्रमाणे काम करावे व संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी. वीजमीटर सुस्थितीत असतानाही प्रत्यक्षात मात्र बिलिंगमध्ये कमी वीजवापराची नोंद होत आहे व महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अचूक मीटर रिडींगसाठी लक्षपूर्वक पर्यवेक्षण करावे व ज्या ग्राहकांचा वीजवापर मीटर सुस्थितीत असतानाही दरमहा शून्य किंवा 1 ते 30 युनिट तसेच सरासरी असल्याचे दिसून येत आहे. त्याची व्यवस्थित पडताळणी करून योग्य वीज वापराचे व रिडींगचे वीजबिल देण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर हयगय करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सातारा, फलटण, कराड, वडूज व वाई विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीचा आढावा घेण्यात आला व वसुली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

सातारा जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 1 लाख 71 हजार थकबाकीदारांकडून 12 कोटी 60 लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. कार्यकारी अभियंते, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख, लेखा अधिकारी व कर्मचारी आणि जनमित्रांनी प्रादेशिक संचालक ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget