Breaking News

ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे - नागवडे


संगमनेर/प्रतिनिधी
कुटूंबात महिला हा महत्वाचा घटक असून अनेक महत्वाची दैनंदिन कामे महिलांना पार पाडावी लागतात. यात स्त्रीयांचे स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे व बचतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधाताई नागवडे यांनी केले आहे.

धांदरफळ खु येथे झालेल्या हळदी कुंकू व तीळगुळ वाटप समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी दुर्गाताई तांबे या होत्या तर व्यासपीठावर सभापती निशाताई कोकणे, अर्चनाताई बालोडे, रेखा लबडे, सोनाली नावंदर, दत्तात्रय कोकणे, मुरली अप्पा खताळ, योगेश खताळ, सागर खताळ, राधा खताळ, विकास कोकणे, अनुराधा खताळ, बर्डे नानी, सरिता नानी, सविता देवगिरे, सुमन खताळ, सिंधूबाई देवगिरे, बिडवेताई, कवता खताळ , संगिता खताळ, संपत अप्पा देवगिरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागवडे म्हणाल्या कि, महिलांनी स्वताच्या आरोग्याबरोबरच बचतीकडे लक्ष द्यायला हवे. कारण आजची बचत हीच उद्याचा मोठा ठेवा ठरणार आहे. समाजात असणार्या चालिरीतींवर महिलांचा खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे कुटूंबावर आर्थिक ताण येतो. महिलांनी विवाह, बारसे, वाढदिवस यासांरख्या कार्यक्रमांत होणारा खर्च टाळावा व बचत करावी. बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध असून त्याचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी महिलांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्पे सर यांनी केले. यावेळी परिसरातील महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.