Breaking News

संगमनेर नगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सभागृहात मंजूर


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्यासाठी सोमवारी दि.25 रोजी बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांची बैठकीत मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी आगामी 2019-2020 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले.
वार्षिक अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यास नगराध्यक्षांसह सदस्यदेखील सुरुवातीपासून अनुकूल नव्हते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले अंदाजपत्रक सभागृहासमोर येताच सुखावलेल्या नगरसेवकांनी त्याला तात्काळ मान्यता दिली.

यावेळी जमा-खर्चाच्या विविध विषयांवर सदस्यांनी चर्चा करत काही दुरुस्त्यादेखील सुचविल्या. गेल्यावर्षी दहा लाख रुपयांची शिल्लक असलेल्या नगरपालिकेला विविध कर आणि अनुदानातुन 115 कोटी 37 लाख 51 हजार 500 रुपये मिळणे अपेक्षित आहे. कर्मचार्‍यांचे पगार, नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवा, भांडवली कामे, निलंबन लेखे यावर यावर्षी 115 कोटी 31 लाख 19 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यातुन वर्षाकाठी नगरपालिकेच्या हाती 6 लाख 32 हजार 500 रुपये शिल्लक राहणार आहेत. नगरपालिका प्रशासनाने जमा-खर्चाची तोेंडमिळवणी करत यावर्षी करवाढीच्या आर्थिक बोजापासून संगमनेरकरांना दिलासा दिला असला तरी नगरपालिकेला मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. पाणीपट्टी आणि घरपट्टी हे नगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. याशिवाय बाजारकर, गाळेभाडे आदी काही बाबीतुन पालिकेला उत्पन्न मिळते. काही दिवसांपुर्वीच मुख्याधिकार्‍यांनी संगमनेरकरांवर घरपट्टी वाढीचा बोजा टाकला होता.

असे आहे नगर नगरपालिकेचे अंदाजपत्रक 10 लाख रुपये सुरुवातीची शिल्लक, 38 कोटी 6 लाख 86 हजार 500 रुपये महसूली तर 77 कोटी 20 लाख 65 हजार रुपये भांडवली जमा दाखविण्यात आले असून नगरपरिषदेकडे 2019-2020 या वर्षात 115 कोटी 37 लाख 51 हजार जमा होणार आहेत. तर 32 कोटी 90 लाख 14 हजार रुपये महसूली व 2 कोटी 41 लाख 5 हजार रुपये भांडवली खर्च होवून नगरपालिकेच्या हाती वर्षाअखेरिस 6 लाख 32 हजार 500 रुपये शिल्लक राहतील.

शहर विकासाच्यादृष्टीने नवे धोरण
शहर विकासाच्या दृष्टीने नगरपरिषदेने धोरण हाती घेतले आहे. यात भुसंपादन प्रक्रियेसाठी 1 कोटी, भुमिगत विद्युत वाहिन्यांसाठी 1 कोटी, राज्यस्तर नगरोत्थान अभियाना अंतर्गत भुयारी गटार योजना व एसटीपी प्लॅनसाठी 35 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 कोटी, नाविन्यपुर्ण विकास योजनेसाठी 30 लाख अशा महत्वाच्या कामासाठी आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

शहर विकासासाठी कटीबध्द
आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. शहराचा लौकीक वाढवितांना स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेरच्या स्वप्नपुर्तीसाठी प्रयत्न सुरु राहतील. संगमनेरकर नेहमीच विकासासोबत राहिले आहेत.- दुर्गा तांबे, नगराध्यक्ष, संगमनेर नगरपरिषद