अवैध वाळू वाहतूकप्रकरणी एकास सक्तमजुरी
लोणंद (प्रतिनिधी): पाडेगाव, ता. खंडाळा येथून विनापरवाना वाळूची वाहतूक करताना लोणंद पोलिसांनी अटक केलेल्या सागर अरुण कुंभार (रा. रावडी खुर्द, ता. फलटण) यास खंडाळा न्यायालयाचे प्रथम वर्ग दंडाधिकारी न्या. ए. बी. चव्हाण यांनी तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त-मजुरी, अशी शिक्षा सुनावली. वाळूमाफियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे खंडाळा व फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाडेगाव येथून स्वत:च्या फायद्यासाठी दि.15 जानेवारी 2015 रोजी विनापरवाना ट्रकमधून (क्र. एमएच 12 एक्यू 4731) बेकायदा चार ब्रास वाळूची वाहतूक करताना आरोपी सागर अरुण कुंभार हा लोणंद पोलिसांना आढळून आला होता. त्यावेळी लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती बोराटे, सहाय्यक फौजदार यशवंत महामुलकर, हवालदार शिवाजी तोडरमल यांनी केला होता. खंडाळा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल लागून सागर कुंभार याला खंडाळ्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.ए. बी. चव्हाण यांनी तीन वर्ष सक्त मजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने सक्त मजुरी, अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याकामी सरकारी वकील म्हणून एस. व्ही. मोरे- देसाई यांनी सरकारतर्फे काम पाहिले. त्यांना हवालदार सुनील गायकवाड यांनी सहकार्य केले. या शिक्षेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
Post a Comment