Breaking News

सैदापूरला एकावर तलवारीने वार


कर्‍हाड (प्रतिनिधी) : सैदापूर (ता. कर्‍हाड) येथील एका हॉटेलसमोर चौघांनी मोटारसायकलवरून येऊन दुसर्या मोटारसायकलस्वाराला गाडी आडवी मारली. त्यानंतर एकावर तलवारीने वार व त्याच्या मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना काल घडली. याप्रकरणी ऋत्वीक तानाजी जगदाळे (वय 19) रा. शिरवडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन महेश घाडगे रा. मंगळवार पेठ याच्यासह चौघांवुर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी, ऋत्वीक हा त्याचा मित्र सौरभ कदम याला रेड चिल्ली हॉटेलसमोर असलेल्या स्नॅक्स सेंटरला सोडण्यासाठी अ‍ॅक्सेस गाडीवरून जात होता. त्यादरम्यान डिव्हायडर ओलांडण्यासाठी तो थांबले असताना महेश घाडगे व त्याचे अनोळखी तिन मित्र मोटारसायकल वरून येऊन त्यांनी ऋत्वीकच्या गाडीला गाडी आडवी मारली. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी सौरभ हा भांडणे सोडविण्याकरीता गेला असता त्यालाही चौघांनी मारहाण केली. त्यावेळी दोघांनी ऋत्वीकला धरले व महेश घाडगे याने हातात तलवार घेऊन तुला लय मस्ती आली आहे, असे म्हणून तलवारीने हातावरती वार केला. यामध्ये ऋत्वीक गंभीर जखमी झाला. याबाबत ऋत्वीकने दिलेल्या फिर्यादीवरुन महेश घाडगेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.