Breaking News

बेकायदा वाळू उपसा दोन डंपर पकडले


लोणंद (प्रतिनिधी) : फलटण तालुकयातील हिंगणगाव येथून विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूने भरलेले दोन डंपर तांबवे धरणामधील पाण्याने धुवून निंबोडी गावच्या हद्दीत घराच्या बाजूला लपवून ठेवल्याची माहिती खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत जाऊन लक्ष्मीनारायण सप्लायर्सचे मालक काशीनाथ नारायण शेळके निंबोडी ता. खंडाळा यांच्या मालकीचे वाळूने भरलेले दोन्ही डंपर ताब्यात घेतले. या वाळू चोरीचा पंचनामा महसुल खात्याच्यावतीने करण्यात येवून दोन्ही डंपर पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले.
फलटण व खंडाळा तालुक्यात वाळू माफियांनी धुमाकुळ घातला असून दिवसाढवळ्या व रात्रीही मोठया प्रमाणावर वाळूचे बेकायदेशीरपणे उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात येत आहे.

निंबोडी गावाजवळ असणार्‍या जिल्हा परिषद शाळेच्याजवळील विस्तारित गावठाणातील घराजवळ हिंगणगाव येथून अनाधिकृतपणे उत्खनन करुन दोन डंपर मधून आणलेली वाळू तांबवे धरणातील पाण्याने धुऊन ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती विवेक जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिरवळचे मंडलाधिकारी कोंडके यांच्यासमवेत मारला टाकला. त्याठिकाणी वाळूने भरलेले दोन डंपर आढळून आले. तर दोन डंपर मोकळे आढळून आले.

विवेक जाधव यांनी लोणंदचे मंडलाधिकारी बोबडे यांच्या ताब्यात डंपर दिल्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया करुन दोन्ही डंपर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.

वाळूच्या डंपरवर दंडात्मक कारवाई होणार की अनाधिकृत वाळू वाहतुकीचा गुन्हा दाखल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.