Breaking News

अग्रलेख - मोठेपणाचा तिढा


लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना शिवसेना व भाजप यांची युती होणार, की नाही, याबाबतचा घोळ अजून कायम आहे. शिवसेना दररोज भाजपचे वस्त्रहरण करीत असताना भाजपला मात्र शिवसेनेशी युती हवी आहे. लाचारी पत्करून युती करणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढू असे इशारे एकीकडे द्यायचे आणि दुसरीकडे शिवसेनेचे शाब्दिक वार मुकाट्याने झेलायचे, असे भाजपचे धोरण दिसते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपने शिवसेनेशी युतीच्या प्रयत्नांना वेग दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. अर्थात शाह यांनी गेल्या आठवड्यात ही ठाकरे यांना फोन केला होता; परंतु त्यातून युती करण्याच्या हालचालींना गती आली नाही. आता तर उद्धव यांनी ‘मोठया भावा’चा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव शाह यांच्यापुढे ठेवला आहे. 

1995 च्या जागावाटपाचे सूत्र कायम ठेवणे सध्या तरी भाजपला शक्य नाही. 1995 च्या सूत्राचाच आधार घ्यायचा झाला, तर भाजपला विधानसभेच्या 116 च जागा लढवाव्या लागतील. भाजपचे 122 आमदार असताना एवढया कमी जागा भाजप घेणे कदापि शक्य नाही. शिवसेनेलाही ते माहीत नाही, असे थोडेच आहे; परंतु शिवसेनेने भाजपवर सातत्याने दबाव वाढवीत न्यायचे ठरविले आहे. भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी साथ सोडली नाही. उत्तर प्रदेशातील अपना दल व सोहेलवाल बहुजन समाज पक्ष असे दोन मित्रपक्षही भाजपची साथ सोडण्याचा विचार करीत आहेत. एकीकडे भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलासोबत भाजचे पंजाबमधील जागावाटप झाले असताना महाराष्ट्रात मात्र मोठेपणाचा वाद अजूनही कायम आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत झालेली खराब कामगिरी आणि देशपातळीवर विरोधकांची होत असलेली आघाडी या पार्श्‍वभूमीवर भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर येऊ न उद्धव ठाकरे यांची भेट घेत युतीसाठी शिष्टाई केली होती. प्रशांत किशोर यांनी काय चर्चा केली, काय साकडे घातले, त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी शिवसेनेने युती करण्याचा आग्रह त्यांनी धरला; परंतु शिवसेनेने अजून तरी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. शाह यांनी उद्धव यांना फोन करून जागावाटपाची चर्चा केली. शाह यांचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह आहे; मात्र लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी उद्धव यांची भूमिका आहे. भाजप 116 आणि शिवसेनेने 171 जागा लढवाव्यात, एवढ्यापुरतीच शिवसेनेची मर्यादित भूमिका नाही, तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. शाह यांनी लोकसभेच्याच जागावाटपाला प्राधान्य दिल्याने आणि ठाकरे यांनी शिवसेनाच मोठा भाऊ आहोत, या भूमिकेपासून आपण हटणार नाही, असे स्पष्ट संकेत शिवसेनेने दिल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे.

शाह आणि ठाकरे यांच्यात दोन पावले मागे कुणी यायचे, हेच अजून ठरत नाही. त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपाचे घोडे अडून बसले आहे. शिवसेनेने भाजपला नाकुदर्‍या काढायला लावल्या आहेत. त्यासाठी दबावतंत्र वाढवायला सुरुवात केली आहे. मुखपत्रातून दररोज टीका होते आहे. विरोधकांच्या टीकेपेक्षा वाघाचे बाणच जास्त जिव्हारी लागत आहेत; परंतु भाजपलाही दुसरा पर्याय नाही. एक एक मित्रपक्ष गमावणे सध्या परवडणारे नाही. शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांना युती हवी असली, तरी उद्धव हे खासदार संजय राऊत यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात, क ी काय असे वाटावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधामुळे खासदार, आमदार, मंत्र्यांचीही गोची झाली आहे. त्यातच भाजपच्या मतदारंसघात शिवसेनेने मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेला खरेच युती करायची, की केवळ भाजपवर दबाव वाढविण्यासाठी सर्व जागा लढवण्याचे संकेत द्यायचेे, हा संभ्रम आहे. एकीकडे युतीचे तुम्ही माझ्यावर सोडा, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असे ठाकरे सांगतात आणि दुसरीकडे युतीसाठी भाजपने कितीही प्रस्ताव दिले, तरी प्रस्तावच आला नाही, असे सांगायचे, या नीतीतून शिवसेनेचा गोंधळ झाला आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या तेलुगु देसमला पाठिंबा देण्यासाठी खासदार संजय राऊत गेल्यामुळे भाजपच्या पोटात गोळा आला असेल. तेलुगु देसमही दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडत आहे. आंध्र प्रदेशात तेलुगु देसम पक्षापुढे भाजपचे आव्हानच नाही; परंतु भाजपची वायएसआर काँग्रेसशी वाढती जवळीक पाहता त्या पक्षाला शह देण्यासाठी आणि लोकसभेबरोबरच होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशात आपली सत्ता यावी, यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबा नायडू यांनी उपोषण नाट्य केले. केंद्र सरकार राज्यावर कसा अन्याय करते आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सर्व मोदीविरोधक उपोषणाच्या ठिकाणी आले. मोदीविरोधकांनी तिथे उपस्थित राहण्यामुळे भाजपला आश्‍चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही; परंतु शिवसेनेच्या वतीने राऊत तिथे उपस्थित राहतात आणि नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दाखवितात, यावरून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी क रण्याचा प्रयत्न चालविला आहे, हे स्पष्ट दिसते. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार्‍या नायडू यांच्या तेलुगू देसमशी शिवसेनेची जवळीक सोमवारी अधिक घट्ट झाली. युती होणारच, असे भाजपचे नेते मुंबईत सांगत असताना शिवसेनेने दि ल्लीत चंद्राबाबूंच्या उपोषणास पाठिंबा देत भाजपला धक्का दिला. भाजप युतीधर्माचे पालन करीत नसल्याच्या शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले, तेव्हाही शिवसेनेने त्यांची जोरदार पाठराखण केली होती.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी चंद्राबाबूंनी सोमवारी नवी दिल्लीत एक दिवसाचे उपवास केले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची उपोषणस्थळी रीघ लागली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आदी नेत्यांसमवेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही चंद्राबाबूंच्या उपोषण मंडपात हजेरी लावून त्यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. भाजपने शब्द न पाळल्याने आंध्र प्रदेशच्या अस्मितेस डिवचले आहे, असा आरोप आज उपोषण सुरू करताना चंद्राबाबूंनी केला. गेल्या वर्षी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अशीच आगपाखड करीत स्वबळाचा नारा दिला होता. पुढे काही दिवसांतच रालोआमधून बाहेर पडून चंद्राबाबूंनी भाजपला जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले, असा दावा खासदार राऊत यांनी तेव्हा केला होता. गेल्या वर्षभरात चंद्राबाबू व शिवसेना यांची जवळीक अधिकच वाढली. चंद्राबाबू व उद्धव ठाकरे यांच्यात खलबते होत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. केंद्रातील व महाराष्ट्रातील सत्तेत शिवसेना सहभागी असली, तरी सेना-भाजपमधील दरी दिवसेंदिवस रुंदावत असून भाजपच्या नेतृत्वाविषयीची शिवसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. शिवसेनेशी युती व्हावी यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे सर्व भाजप नेते प्रयत्नशील असताना राऊत यांनी चंद्राबाबूंची पाठराखण करून भाजपला नवा इशारा दिल्याचे मानले जात आहे.