Breaking News

सलग सातव्या वर्षी शिखरजी वाटेवर स्वच्छता मोहीम; सन्मती सेवा दलाचा उपक्रम


म्हसवड (प्रतिनिधी) : तीर्थयात्रेला समाज सेवेची जोड देत सन्मती सेवा दलाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून जैन समाजातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणार्‍या झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी पहाडावर यंदा सलग सातव्या वर्षी स्वच्छता अभियान राबवत व पहाडावर सिड बॉल टाकून परीक्रमा पूर्ण केली .

या टिममध्ये माळशिरस तालुक्यातील सन्मती सेवा दल स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी, विद्यमान अध्यक्ष डॉ. राजेश शहा, उपाध्यक्ष प्रा. मनिष शहा, सेक्रेटरी प्रशांत जंबुकुमार दोशी , संतोष दोशी, सुजय दोशी, अशोक दोशी, अदित्य शहा, रौनक शहा, संकेत शहा, जिनेश दोशी,  सह महाराष्ट्रसह गोवा कर्नाटक राज्यातील सन्मती सेवा दलाच्या 264 स्वयंसेवकांचा सहभाग असल्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ राजेश शहा यांनी सांगितले. झारखंड राज्यातील समुद्रसपाटी पासून 4500 फुट उंचीवर असलेले शिखरजी हे जैन धर्मातील अत्यंत महत्वाचे व पवित्र ठिकाण मानले जाते. आजपर्यंत या ठिकाणी 24 पैकी 20 जैन धर्मिय तिर्थकारांना मोक्ष प्राप्त झाला आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी लाखो भाविक भेट देत असतात. येथील वंदना परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 27 किलोमिटरचा पायी प्रवास करावा लागतो. हा प्रवास करतानाच सुमारे साडेचारशे ते पाचशे किलो कचरा जाळून नष्ट करण्यात आला. वंदना करताना सुमारे तीनशे सीड बॉल्स टाकून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्न करण्यात आले.

या ठिकाणी जाताना सन्मती सेवा दलाने मात्र अनोखा पायंडा पाडला. प्रवास करताना परिसरातील प्लास्टिक बॉटल, बिस्किट पुड्याचे कव्हर, प्लास्टिक पिशव्या, कागद नारळाचे करवंट्या आदींना जाळून नष्ट करण्यात आले. स्वच्छतेतुन ईश्‍वर भक्ति हा सन्देश मिहिर गांधी गेल्या सात वर्षापासून देत आहेत. गेल्या वर्षी या अभियानाची नोंद गोल्डन बुकमध्ये केली गेली होती. या अभियानात शिखरजी पर्वतावरील स्थानिक स्वयंसेवकांनी, नागरिकांनी व स्टॉल धारकांनीही या स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदविला.