Breaking News

दलित वस्ती सुधार योजनेसाठी कोपरगावला पाच कोटी-आशुतोष काळे


कोपरगाव ता/प्रतिनिधी: जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण विभागाकडून भागातील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत अनुसुचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागाला पाच कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर व खोपडी गावच्या पाणी पुरवठा योजनांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनांसाठी एक कोटी 33 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, शासनाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्‍या सर्व समाजाभिमुख योजनांचा सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सदस्य वेळोवेळी पाठपुरावा करीत असतात. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीचे काम अतिशय प्रगतीपथावर आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या खोल्या, अंगणवाडी इमारतींचे मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावर जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी माझे सतत प्रयत्न सुरु असतात. त्या प्रयत्नातूनच कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातीलदलित वस्ती सुधार योजनेसाठी पाच कोटी निधी मिळवू शकलो आहे. या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजबांधवांच्या वस्तीवरील पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटार बांधकाम, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते आदी विकास कामे मार्गी लागणार आहेत. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत शहाजापूर ग्रामस्थांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 77 लाख 41 हजार 460 व कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खोपडी ग्रामस्थांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 55 लाख 60 हजार 110 असा एक कोटी तेहतीस लाख एक हजार पाचशे त्र्याहत्तर रुपयांचा निधी मिळाला असून या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पाणी पुरवठा योजनांचे कामे लवकरच सुरु होणार असल्याची माहिती दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवून यापुढील काळातही ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.