Breaking News

समर्थ सेवा मंडळातर्फे विविध कार्यक्रम


सातारा (प्रतिनिधी) : श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचेवतीने समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात दासनवमी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे दि. 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे. दासनवमी महोत्सवातील भक्तनिवासात सलग 10 दिवस अनेक मान्यवरांची कीर्तने, प्रवचन व गायन सेवा संपन्न होणार आहे.

महोत्सव काळामध्ये होणारे विशेष कार्यक्रम पुढीलप्रमाणे गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान रोज सकाळी 8 ते 11 या वेळेत नितीनबुवा रामदासी व सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे मार्गदर्शनाखाली दासबोध वाचन, दि.20 व 21 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी व दि.22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यत ह.भ.प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होणार आहेत. दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 पर्यत दररोेज दासनवमीअखेर समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. संगीत महोत्सवात बुधवार दि.20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आळंदी पुणे येथील पं.अवधूत गांधी यांचे संत साहित्यातील लोकसंगीत हा गायन कार्यक्रम होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर पांडुरंग पवार व पखवाज श्री बधे व संबळसाथ सोमनाथ तरटे हे करणार आहेत. गुरूवार दि.21 रोजी सायंकाळी 7 वाजता सौ. धनश्री देव देशपांडे व राजेश्री देव ओक यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत गंगाधर देव हे करणार आहेत. शुक्रवार दि. 22 रोजी सायंकाळी 7 वाजता उज्जैन मध्यप्रदेश येथील रागिणी देवळे व पुणे येथील सौरभ नाईक यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत प्रणव गुरव व रोहित मराठे हे करणार आहेत. शनिवार दि.23 रोजी सायंकाळी 7 वाजता मध्यप्रदेशातील देवासे येथील भूवनेश ओमकली यांचे उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना साथ संगत भरत कामत व सुयोग कुंडलकर करणार आहेत. रविवार दि.24 रोजी सायंकाळी 7 वाजता पं.शौनक अभिषेकी यांचे गायन होणार असून त्यांना साथ भरत कामत व सुयोग कुंडलकर करणार आहेत. सोमवार दि.25 रोजी सायंकाळी 7 वाजता पुणे येथील सौ.रेवा नातू व मुंबई येथील पं.रूपक कुलकर्णी यांचे गायन व बासरीवादन होणार आहे. त्यांना पं. विजय घाटे यांची तबला साथ असून रोहित मुजूमदार व अभिषेक सिनकर हे संवादिनी साथ करणार आहेत. गायन महोत्सवाची सांगता मंगळवार, दि. 26 रोजी सायंकाळी 7 वाजता सौ. मंजुषा पाटील यांचे गायनाने होणार असून त्यांना साथ संगत प्रशांत पांडव व तन्मय देवचक्के करणार आहेत.

दासनवमी महोत्सवाची सांगता बुधवार, दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी दासबोध वाचन, कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. या सर्व कार्यक्रम समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्यंवाह समर्थभक्त मारुतीबुवा रामदासी, कोषाध्यक्ष योगेशबुवा पुरोहित रामदासी व कार्याध्यक्ष अ‍ॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे यांनी केले आहे.