Breaking News

अट्टल गुन्हेगार गणेश शेटेला सक्तमजुरी


राहुरी प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे व रस्तालुटीच्या अनेक गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार विशाल ऊर्फ गणेश शेटे याला राहुरी येथील एक गुन्ह्यात दिड वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा राहुरी न्यायालयातील न्यायाधीश कोठावळे यांनी सुनावली .

विशाल ऊर्फ गणेश बाळासाहेब शेटे (वय वर्षे २१, रा. डावखर खळवाडी) याने दिनांक १२ जून २०१८ रोजी राहुरी तालुक्यातील चिंचाळे गाव शिवारात, घोरपडवाडी घाटात रात्रीच्या वेळी अहमदनगर येथील सुभाष भगवान देठे यांची मोटरसायकल अडवून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटने बाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल यांनी केला. त्यानंतर २७ जुलै २०१८ रोजी रात्री पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल, हवालदार गुलाब मोरे, सुरेश भिसे आदिंचे पथक राहुरी फॅक्टरी परिसरात गस्त घालत असताना विशाल ऊर्फ गणेश शेटे हा श्रीरामपूर येथे रस्तालूट करून पळत असताना त्यांच्या तावडीत सापडला होता. यावेळी त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली होती.

तसेच घोरपडवाडी घाटातील गुन्ह्याचा खटला राहुरी न्यायालयातील न्यायाधिश कोठावळे यांच्या समोर सुरू होता. तर सरकारी वकील अनिल शिंपी यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पहिले. या खटल्यातील पंच व साक्षीदारांच्या साक्ष तपासणी नंतर दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ रोजी हा खटला निकाली काढण्यात आला. यावेळी त्यास १८ महिने सक्त मजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्या कामी जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार व श्रीरामपूर येथील तत्कालीन उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. गणेश शेटेवर अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली तर काही गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.